मुख्यमंत्री ठाकरेंच्या एका फोननंतर जळगावमध्ये सत्तांतर! खडसेंनी केला सत्तानाट्याचा उलगडा - ncp leader eknath khadse tells about jalgaon municipal corporation political game | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

मुख्यमंत्री ठाकरेंच्या एका फोननंतर जळगावमध्ये सत्तांतर! खडसेंनी केला सत्तानाट्याचा उलगडा

कैलास शिंदे
गुरुवार, 18 मार्च 2021

जळगाव महापालिकेत सत्तांतर झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी  यामागील नाट्याचा उलगडा केला आहे.         

जळगाव : जळगाव महापालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोननंतर सत्तांतर झाले,  असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. यामुळे अखेर जळगाव महापालिकेतील सत्तानाट्याचा उलगडा झाला आहे. या सत्तांतराला कारणीभूत ठरलेल्या पडद्यामागील गोष्टीही खडसेंनी उघड केल्या आहेत. 

खडसे म्हणाले की, मी काही कामानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना फोन केला होता. फोनवर चर्चा करत असताना जळगाव शहरात रस्त्यांची झालेली दुरवस्था,  रखडलेली विकास कामे याबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे राज्याचे प्रमुख या नात्याने जळगाव शहराकडे लक्ष देऊन शहराच्या विकासाला लागलेल ग्रहण सोडवावे अशी विनंती केली.  

मुख्यमंत्र्यांनी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीला किती अवधी आहे, अशी विचारणा मला केली. निवडणुकीस अडीच वर्षे बाकी आहेत, परंतु येणाऱ्या 15  दिवसात महापौर व उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया होणार असल्याचे मी सांगितले. तसेच, माझ्या संपर्कात भाजपचे 22-25 नगरसेवक असून, त्यांची सत्ताधारी पक्षाविषयी प्रचंड नाराजी आहेत. शहराच्या विकासासाठी बदल व्हावा, असे मतही या नगरसेवकांनी माझ्याकडे व्यक्त केले आहे. तसेच, जळगाव शहराच्या विकासकामांना गती यावी म्हणून शिवसेनेचा महापौर होणार असेल तर मी यात मदत करु शकेन, असे मुख्यमंत्र्यांनी मी सांगितले, असे खडसे म्हणाले.  

मुख्यमंत्र्यांनी विनायक राऊतांशी चर्चा करुन तुम्ही ठरवा, असे मला सांगितले. त्यानंतर काही वेळातच विनायक राऊतांनी फोन करुन सत्तांतराबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी सोपवली. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि मी चर्चा केली. यात महापौर शिवसेनेचा व उपमहापौर फुटीर नगरसेवकांमधून करण्याच निर्णय मी घेईन असे ठरले, असे खडसेंनी सांगितले. 

सुनिल खडके व त्यांच्या संपर्कात असलेले 10-12 नगरसेवकांनी मुक्ताईनगर येथील फार्महाउसवर 4-5 दिवसांपूर्वी रात्री उशिरा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जळगावच्या विकासासाठी सत्तांतर करण्यासाठी पुढाकार घ्यावा आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली सत्तांतर करु, असा विश्वास त्यांनी मला दिला. त्यावेळी मी उपस्थित नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्याची जाणीव करुन दिली. यावर नगरसेवकांनी  आमचे सदस्यत्व गेले तरी चालेल पण शहराच्या विकासाकरता महापालिकेत तुमच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर  नगरसेवकांच्या इच्छेनुसार सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या आणि बघता बघता नगरसेवकांची संख्या 22 वर येऊन पोहचली, असे खडसेंनी नमूद केले. 

शिवसेनेचे नगरसेवक सुनिल महाजन यांनी माझी भेट घेतली. त्यावेळी महाजन यांनी महापौरपदाकरता त्यांच्या पत्नी जयश्री महाजन यांना संधी द्यावी आणि यासाठी शिवसेनेचे 15  व एमआयएमचे 3 नगरसेवकांची संमती आहे. तुम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून माझ्या पत्नीची महापौरपदाकरता शिफारस करावी, अशी विनंती केली. त्यानंतर उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत या नेत्यांशी मी चर्चा केली, असे खडसेंनी स्पष्ट केले. 

त्यावेळी महापौरपदाकरता जयश्री सुनिल महाजन व उपमहापौरपदाकरता सुनिल खडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर सर्व नगरसेवकांची व्यवस्था शिवसेना करेल असे ठरले. त्यामुळे वरिष्ठांनी सुचवल्याप्रमाणे महापालिकेतील सत्तांतराबाबत काहीही कल्पना नसलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडे जळगाव महापालिकेतील माझ्या समर्थक नगरसेवकांसोबत शिवसेना व एमआयएमच्या नगरसेवकांना पाठवण्यात आले. तेथून सर्व नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले, असे खडसेंनी सांगितले. 

दोन दिवसांपुर्वी मी मुंबईत गेलो आणि शिवसेना नेत्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी जळगाव शहरातील सामाजिक गणितानुसार उपमहापौरपद सुनिल खडकेंना न देता मराठा समाजाला संधी द्यावी व स्थायी समितीचे सभापतीपद सुनिल खडकेंना देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य शिवसेना नेत्यांनी दिले. आजतागायत सत्तांतराकरीता लागणारी नगरसेवकांची ही संख्या 45 च्या वर जाऊन पोचली असून मी जळगावच्या विकासाकरता उचलेला सत्ता परिवर्तनाच्या विड्यातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जळगाव मनपात सत्तांतर घडले आहे, असे खडसेंनी नमूद केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख