लॉकडाउन नकोच! आनंद महिंद्रांसह राष्ट्रवादी काँग्रेस अन् चंद्रकांत पाटलांचा सूर - ncp chandrkant patil and anand mahindra oppose lockdown in mahrashtra | Politics Marathi News - Sarkarnama

लॉकडाउन नकोच! आनंद महिंद्रांसह राष्ट्रवादी काँग्रेस अन् चंद्रकांत पाटलांचा सूर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मार्च 2021

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि नागरिकांकडून निर्बंधांचे योग्य पालन होत नसल्याने राज्य सरकारने पुन्हा लॉकडाउनची तयारी सुरू केली आहे. 

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. नागरिकांकडून निर्बंधांचे योग्य पालन होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे राज्य सरकारने पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. यामुळे उद्योगविश्वात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पुन्हा लॉकडाउन लागू करण्यास विरोध केला आहे. याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ उद्योगपती व महिंद्रा उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही हाच मुद्दा उचलून धरला आहे. 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाउन करण्याच्या पर्यायावर सध्या उच्चस्तरीय पातळीवर विचार सुरू आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध खाटांचे प्रमाण लक्षात घेता नव्याने व्यवस्था उभारण्यासाठी आणखी वेळ लागेल, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. 

आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे हे मत सरकारने विचारात घेऊन लॉकडाउन केल्यास राज्याचे अर्थचक्र विस्कळित होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. देशात केवळ महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढत चालल्याने राज्यात लॉकडाउन लागू करणे योग्य ठरेल काय याबद्दल आज दिवसभर चर्चा सुरू होती. नुकत्याच झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीतही तज्ज्ञांनी लॉकडाउनचा लागू करण्याच्या बाजूने मत मांडले होते. 

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाउन हा अंतिम पर्याय नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. ज्येष्ठ उद्योगपती व महिंद्रा उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाउनच्या विरोधात भूमिका घेतली आहे. लॉकडाउन करण्याऐवजी सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यावर भर द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाउनला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (ता.28) झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना लॉकडाउनसारखे कठोर नियम तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील संभाव्य ताण आणि अपुरी पडणारी रुग्णालये यामुळे अतिदक्षता विभागांचा (आयसीयू) वापर अधिक सुलभ पद्धतीने व्हावा म्हणून पावले टाकण्याचेही निर्देशही या बैठकीत देण्यात आले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख