वानखेडे अॅक्शन मोडवर; नांदेडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी

सोमवारी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
वानखेडे अॅक्शन मोडवर; नांदेडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी
NCB seized ganja in Nandedsarkarnama

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनेक आरोपांचा सामना करत असलेले अमलीपदार्थ विरोधी पथकाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पुन्हा कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी वानखेडे यांच्या विभागाने नांदेड (Nanded) जिल्ह्यात तब्बल 1 हजार 127 किलो गांजा भरलेला ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणात दोघांना अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी नांदेडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात मंजराम येथे गांजा पकडण्यात आला आहे. हा गांजा जळगाव येथे नेला जाणार होता. तिथून महाराष्ट्रात ठिकठिकाणी गांजाचे वितरण केले जाणार होते. हैद्राबाद नांदेड मार्गावर गांजा वाहतूकचे नेटवर्क असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम् येथून आणला जात होता. मुंबई एनसीबीने मागील काही दिवसांत केलेली ही मोठी कारवाई आहे. अटक केलेल्या दोघांना मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

NCB seized ganja in Nanded
गोसावी अन् खबऱ्याचं चॅट उघड करत मलिकांचा वानखेडेंवर बाण

क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खानला अडकवण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. तसेच वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावरून वानखेडे यांच्या वडिलांनी मलिकांच्या विरोधात मानहानीचा दावाही दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात दररोज नवे खुलासे केले जात आहेत. आरोपांनंतर वानखेडे यांच्याकडील आर्य़न खान प्रकरणाचा तपास अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मुबंई मोठ्या प्रमाणात अमल पदार्थ विरोधी पथकाकडून (एनसीबी) कारवाया केल्या जात आहेत. एनसीबीने अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या विरोधात मोहिम उघडली आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जच्या (Drugs) विरोधात मलिया मियाना येथून 120 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

पाकिस्तानातूनच हे अंमली पदार्थ भारतात आणले जात असल्याची माहिती आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे 600 कोटी रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग माफिया खालिद बख्शशी (Khalid Bakhsh) संबंधित असल्याचे समजते. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचा प्लॅन दुबई येथे रचला असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. पाकिस्तानी ड्रग्ज माफिया खालिदने जब्बार आणि गुलाम नावाच्या दोन भारतीय तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टीनमध्ये भेट घेतली होती. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

गेल्या आठवड्यात गुजरातमधील पोलिसांनी देवभूमी द्वारका आणि सुरतमध्ये हेरॉइनसह अनेक अंमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईमध्ये तीन जणांना अटक करण्यात आली होती. देवभूमी द्वारका येथील ड्रग्ज पॅडलरकडून 88.25 कोटी रुपये किमतीचे 17 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in