एनसीबीची मोठी छापेमारी : नांदेड, जालना, औरंगाबादसह काही जिल्हे काढणार पिंजून

एनसीबीने मागील काही महिन्यांत एकाच वेळी एवढ्या ठिकाणी पहिल्यांदाच छापेमारी केल्याची चर्चा आहे.
एनसीबीची मोठी छापेमारी : नांदेड, जालना, औरंगाबादसह काही जिल्हे काढणार पिंजून
NCBsarkarnama

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर (Cruise Drugs Case) चर्चेत आलेल्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मागील आठवड्यात विभागाने नांदेड (Nanded) जिल्ह्यात तब्बल 1 हजार 127 किलो गांजा भरलेला ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणात दोघांना अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर नांदेडमध्ये दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. आता याच प्रकरणात नांदेडसह जालना, औरंगाबाद व अन्य काही जिल्ह्यांमध्ये एनसीबीने एकाचवेळी छापेमारी सुरू केली आहे.

एनसीबीने मागील काही महिन्यांत एकाच वेळी एवढ्या ठिकाणी पहिल्यांदाच छापेमारी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कारवाईमध्ये एनसीबीच्या हाती काय लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात मंजराम येथे गांजा पकडण्यात आला आहे. हा गांजा जळगाव येथे नेला जाणार होता. तिथून महाराष्ट्रात ठिकठिकाणी गांजाचे वितरण केले जाणार होते.

NCB
मुख्यमंत्र्यांना पराभूत केलं नाही तर राजकारण सोडणार! बड्या नेत्याची घोषणा

हैद्राबाद नांदेड मार्गावर गांजा वाहतूकचे नेटवर्क असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम् येथून आणला जात होता. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे एनसीबीकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व धागेदोरे तपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्याच्यादृष्टीने एनसीबीने कंबर कसल्याचे समजते.

मुंबई एनसीबीने मागील काही दिवसांत केलेली ही मोठी कारवाई आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खानला अडकवण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. तसेच वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावरून वानखेडे यांच्या वडिलांनी मलिकांच्या विरोधात मानहानीचा दावाही दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात दररोज नवे खुलासे केले जात आहेत. आरोपांनंतर वानखेडे यांच्याकडील आर्य़न खान प्रकरणाचा तपास अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून मुबंई मोठ्या प्रमाणात अमल पदार्थ विरोधी पथकाकडून (एनसीबी) कारवाया केल्या जात आहेत. एनसीबीने अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या विरोधात मोहिम उघडली आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मोरबी जिल्ह्यात ड्रग्जच्या (Drugs) विरोधात मलिया मियाना येथून 120 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

पाकिस्तानातूनच हे अंमली पदार्थ भारतात आणले जात असल्याची माहिती आहे. या ड्रग्जची बाजारातील किंमत अंदाजे 600 कोटी रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग माफिया खालिद बख्शशी (Khalid Bakhsh) संबंधित असल्याचे समजते. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. भारतात पाठवण्यात आलेल्या या ड्रग्जचा प्लॅन दुबई येथे रचला असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. पाकिस्तानी ड्रग्ज माफिया खालिदने जब्बार आणि गुलाम नावाच्या दोन भारतीय तस्करांची दुबईतील सोमालिया कॅन्टीनमध्ये भेट घेतली होती. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in