धक्कादायक :  समीर वानखेडेंवर ठेवली जातेय पाळत!
Sameer Wankhede sarkarnama

धक्कादायक : समीर वानखेडेंवर ठेवली जातेय पाळत!

वानखेडे यांच्या नेतृत्वाखाळी एनसीबीने क्रुझवर छापा टाकत आर्यनसह काही जणांना अटक केली आहे.

मुंबई : क्रुझवरील ड्रग पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) मुलगा आर्यनला (Aryan Khan) अटक करणारे अंमलीपदार्थ विरोधी विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Samer Wankhede) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली असून पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

वानखेडे यांच्या नेतृत्वाखाळी एनसीबीने क्रुझवर छापा टाकत आर्यनसह काही जणांना अटक केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. शाहरूख खान व बॉलीवू़डला लक्ष्य करण्यासाठी आर्यनला अटक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच भाजप व एनसीबीने कटकारस्थान करून ही कारवाई केल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Sameer Wankhede
भाजपने दोन आमदार पळवले अन् काँग्रेसनंही दिलं जशास तसं उत्तर!

हा मुद्दा चर्चेत असतानाच वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. वानखेडे हे आईवर अंत्यसंस्कार केलेल्या स्मशानभूमीत नेहमी जातात. तिथेच पाळत ठेवली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना काही पुरावेही सादर केले आहेत. पोलिसांनी स्मशानभूमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतल्याचे समजते. ही पाळत नेमकी कुणाकडून व कशासाठी ठेवली जात आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.

दरम्यान, समीर वानखेडे हे ड्रग पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर चर्चेत आलेले नाहीत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलीवूडची ड्रग्ज मंडळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ( NCB) रडारवर आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने गेल्या एका वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. त्यानंतरही एनसीबीने अनेक धडाकेबाज कारवाया करत ड्रग्ज पेडलर्सच्या पोटात गोळा आणला आहे. सुशांतपासून शाहरुख खानच्या मुलापर्यंत समीर वानखेडे (sameer Wankhede) यांनी कोणत्याही राजकारणी किंवा सेलिब्रिटीला न जुमानता या कारवाया केल्या आहेत.

Sameer Wankhede
एअर इंडियाची मालकी टाटांकडे जाताच पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन; म्हणाले...

समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. वानखेडे यांनी एनसीबीसोबत काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त एसपी म्हणून काम केले आहे. यासह त्यांनी महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)चे सहआयुक्त म्हणूनही काम केले. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंगला विदेशी चलनासह पकडले होते. इतकेच नव्हे तर 2011 ची विश्वचषक ट्रॉफी मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी ड्युटी चार्ज भरल्यानंतरच सोडली होती.

समीर वानखेडे यांची 2010 मध्ये महाराष्ट्र सेवा कर विभागात बदली झाली. त्यानंतर समीर यांनी कर चुकवल्याप्रकरणी 200 बॉलिवूड सेलिब्रिटींसह 2500 लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी फक्त दोन वर्षात तिजोरीत 87 कोटी रुपयांचा महसूल जमा केला. 22 नोव्हेंबर 2020 रोजी औषध विक्रेत्यांच्या हल्ल्यात वानखेडे आणि एनसीबीचे इतर पाच अधिकारीही जखमी झाले होते. समीर यांना किरकोळ दुखापत झाली होती. मात्र त्यांचे दोन साथीदार या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in