तीन राज्य मिळून केली नक्षल्यांनी नवीन झोनची स्थापना; नक्षल संघटनेच्या बळकटीकणाचा प्रयत्न

गेले काही दिवस थंडावलेली चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी नक्षल नेता नंबाला केशव, मिलींद तेलतुमडे व भूपती यांच्या नेतृत्वात तीन राज्य मिळून नवीन झोनची नुकतीच स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांचा समावेश आहे.
तीन राज्य मिळून केली नक्षल्यांनी नवीन झोनची स्थापना; नक्षल संघटनेच्या बळकटीकणाचा प्रयत्न

गडचिरोली : गेले काही दिवस थंडावलेली चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी नक्षल नेता नंबाला केशव, मिलींद तेलतुमडे व भूपती यांच्या नेतृत्वात तीन राज्य मिळून नवीन झोनची नुकतीच स्थापना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांचा समावेश आहे.

छत्तीसगड राज्यात सक्रिय असलेल्या नक्षल संघटनेने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात आपले अस्तीत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यासाठी स्थापन केलेल्या नवीन झोनच्या दलमध्ये युवकांच्या भरतीवर भर दिला जाणार आहे. बालाघाट परिसरातील जंगलात झालेल्या एका बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून नवीन झोनच्या प्रत्येक राज्याची जबाबदारी लवकरच सोपविली जाणार असून त्यासाठी केंद्रीय समितींच्या काही सदस्यांच्या नावांचा विचार सुरू आहे. केंद्रीय समितीचा सदस्य मिलींद तेलतुमडेंचा सध्या बालाघाट परिसरात वावर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. 

जास्त धावपळीची कामे करता येत नसल्याने सुरक्षित ठिकाणावरून ते नक्षल चळवळीचे काम पहात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कसनासूर गावालगत गेल्या वर्षी झालेल्या चकमकीत 40 नक्षलवादी ठार झाले होते. यात काही दलम कमांडरचाही समावेश होता. या घटनेनंतर गेली काही दिवस नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांत कमी आली होती. मात्र पोलिस दलाचा बदला घेण्यासाठी नक्षल नेत्यांची रणनीती सुरू होती. परंतु छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांकडून सातत्याने कोंम्बींग ऑपरेशन सुरू होते. यामुळे नक्षलवाद्यांचे मनसूबे पूर्ण झाले नाही. त्यानंतर केंद्रीय समितीने उत्तर भागात मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचला. यात ते यशस्वी झाले. 

कुरखेडा तालुक्‍यातील जांभुळखेडा गावालगत घडून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. एक नाही तर तब्बल पाच ठिकाणी भूसुरुंग लावून जवानांना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी भास्कर याने आपली सारी ताकद लावली होती. यासाठी तीनशेच्या वर सदस्यांना एकत्र आणून आपले काम फत्ते केले. केंद्रीय समितीने त्याच्या कामाची दखल घेतली असून भास्करकडे लवकरच नवीन झोनच्या एका राज्याची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com