मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) काल रात्री अटक केली. मूच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले होते. काल दिवसभर चौकशीनंतर एनसीबीने त्यांना अटक केली होती. या प्रकरणी नवाब मलिक यांनी अखेर मौन सोडले असून जावयाच्या नावाचा उल्लेख करणे मात्र टाळले आहे.
एनसीबीने वांद्रे पश्चिममधून एका कुरियरकडून गांजा जप्त केला होता. या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, खारमधील करण सजनानी याच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सजनानी, राहिला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि रामकुमार तिवारी यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासात समीर खान यांचे नाव समोर आले होते. त्यांना काल चौकशीसाठी एनसीबीने बोलावले होते. चौकशी झाल्यानंतर एनसीबीने त्यांना अटक केली होती.
Nobody is above the law and it should be applied without any discrimination.
Law will take its due course and justice will prevail.
I respect and have immense faith in our judiciary.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 14, 2021
जावयाला अटक झाल्याप्रकरणी नवाब मलिक यांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी ट्विटरवर या प्रकरणी भूमिका घेतली असून, जावयाचे नाव घेणे मात्र टाळले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. हे प्रत्येक प्रकरणात सर्वांसाठी लागू आहे. कायदा त्याचे काम करेल आणि न्याय मिळेल. माझा न्यायव्यवस्थेवर दृढ विश्वास आहे.
समीर खान यांचा विवाह नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांच्याशी झाला आहे. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ड्रग्स पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला असल्याचा संशय एनसीबीला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावले होते.
एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मूच्छड पानावाला दुकानाचा मालक रामकुमार तिवारी यालाही अटक करण्यात आली असून, त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आले आहे.
Edited by Sanjay Jadhav

