काँग्रेसमध्ये उभी फूट..सिद्धूंकडे 62 तर कॅप्टन यांच्याकडे 15 आमदार - navjot singh sidhu visits golden temple with 63 congress mlas-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

काँग्रेसमध्ये उभी फूट..सिद्धूंकडे 62 तर कॅप्टन यांच्याकडे 15 आमदार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जुलै 2021

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. आता सिद्धूंचे पारडे जड झाले आहे. 

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांनी उघड बंड पुकारले होते. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देऊन हे बंड शमवले. आता सिद्धू हे आक्रमक झाले असून, त्यांनी पक्षातील 62 आमदारांना घेऊन आज सुवर्णमंदिर गाठले. मुख्यमंत्री गटातील केवळ 15 आमदार हे त्यावेळी हजर नव्हते. सिद्धू यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री गटाला धक्का बसला आहे. 

सिद्धू यांनी आज 62 आमदारांसह सुवर्णमंदिराला भेट दिली. काँग्रेसचे एकूण 77 आमदार असून, केवळ 15 आमदार या वेळी हजर नव्हते. यामुळे ते मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या गटातील असल्याचे मानले जात आहे. सिद्धू यांनी आज केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे पंजाबमध्ये तेच कॅप्टन असल्याचे सिद्ध झाले आहे. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना बढती देऊन मुख्यमंत्र्यांना शह दिल्याचे मानले जात आहे. पक्ष नेतृत्वाच्या वरदहस्तामुळे सिद्धू यांनी पक्षातील बहुतांश आमदार आपल्याकडे वळवून घेतले आहेत. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. 

हेही वाचा : काँग्रेसचे नेतृत्व 2024 पर्यंत सोनिया गांधीच करणार 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले आहे. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख