भाजपचा आणखी एक मुख्यमंत्री घरी जाणार? मोदींनी तातडीनं भेटायला बोलावलं

गुजरातनंतर आता हरियानामध्ये बदल होण्याची चर्चा असून, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे.
narendra modi will meet haryana chief minister manohar khattar
narendra modi will meet haryana chief minister manohar khattar

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) आणखी एका राज्यात मुख्यमंत्री (Chief Minister) बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकताच भाजपने गुजरातमध्ये (Gujarat) मुख्यमंत्री बदलला होता. आता हरियानामध्ये (Haryana) बदल होण्याची चर्चा असून, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांना तातडीने दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री खट्टर यांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. आज सायंकाळी 7 वाजता लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी मोदी हे खट्टर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. दरम्यान, कालच खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे खट्टर हे मुख्यमंत्रिपद सोडण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

हरियानात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन आहे. करनाल येथे आंदोलनादरम्यान, शेतकऱ्यांवर लाठीमार झाला होता. यात एक शेतकरी मृत्युमुखी पडला होता तर अनेक जण जखमी झाले होते. यानंतर शेतकरी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. शेतकरी आंदोलनावरुन खट्टर सरकारची कोंडी झाली आहे. याचवेळी पक्षांतर्गत विरोधकही खट्टर यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करू लागले आहेत. 

गुजरातमध्ये वेळेआधीच रूपानी पायउतार 
मागील 6 महिन्यांत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच भाजपच्या चौथ्या मुख्यमंत्र्यांची विकेट पडली आहे. उत्तराखंड, कर्नाटकनंतर आता गुजरातमध्ये वेळेआधीच मुख्यमंत्री बदलण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना विजय रूपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री बनले आहेत. 

उत्तराखंडमध्ये चार महिन्यांत 3 मुख्यमंत्री 
उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मार्च महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्रिपदी तिरथसिंह रावत आले होते. त्यांना चार महिन्यांतच जुलैमध्ये मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. नंतर पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी झाली. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री कोण नेमावा, असा तिढा नेतृत्वासमोर होता. 

कर्नाटकात येडियुरप्पांचा राजीनामा   
येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम जुलैमध्ये आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com