वाजपेयींचा पराभव करणारे राजेही आता भाजपला वाटताहेत जवळचे

उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे.
वाजपेयींचा पराभव करणारे राजेही आता भाजपला वाटताहेत जवळचे
narendra modi will lay stone of raja mahendra pratap singh university

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (Assembly Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी भाजपकडून (BJP) जोरदार तयारी केली जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज राज्याच्या  दौऱ्यावर आहेत. राजा महेंद्र प्रताप सिंह (Mahendra Pratap Singh) विद्यापीठाचे भूमिपूजन मोदी हे करणार आहेत. विशेष म्हणजे याच राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा (Atal Bihari Vajpayee) पराभव केला होता. केवळ जाट मतपेढी डोळ्यासमोर ठेवून भाजपने ही खेळी खेळली आहे. 

पंतप्रधान मोदी हे आज अलिगडमध्ये येत आहेत. विधानसभेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळं त्यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. सध्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर ठिकठिकाणी महापंचायत घेण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चानं केली आहे. या आंदोलनात उत्तर प्रदेशात बहुतांश जाट समाज सहभागी झाला आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायद्यांवरुन जाट समाजाची सरकारविरोधात एकमूठ बांधली आहे. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भाजपने जाट समाजाला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी पावले टाकण्यास सुरवात केली आहे. 

उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये हे विद्यापीठ सुमारे शंभर एकर जागेत उभारले जाणार आहे. राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी 1957 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव केला होता. मथुरा मतदारसंघात दोघे आमनेसामने होते. वाजपेयी हे जनसंघाचे उमेदवार होते. सिंह यांनी ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. 

राजा महेंद्र प्रताप सिंह हे अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1886 रोजी हाथरसमध्ये झाला होता. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी ते आघाडीवर होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत घालवले. तसेच त्यांनी आपली खूप संपत्तीही दान केली होती. अलिगड विद्यापीठालाही त्यांनीच जमीन दिली होती. त्यांचं योगदान लक्षात घेऊन अलिगडमध्ये उभारण्यात येणाऱ्या राजकीय विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं जाणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. 

राजा महेंद्र प्रताप सिंह हे जाट होते. त्यामुळं त्यांचं नाव विद्यापीठाला देऊन जाटांना आपलसं करण्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तसेच जाट राजांच्या नावांना उत्तर प्रदेशात फारसा महत्व दिलं गेलेलं नाही, त्यामुळे विद्यापीठाला नाव देत त्यांचा सन्मान केला जाणार असल्याची भूमिका भाजप नेत्यांकडून मांडली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपल्या भाषणात जाट राजाबद्दल काय बोलणार याचीही उत्सकुता आहे.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in