नारायण राणे दिल्लीला गेले अन् मंत्रिमंडळ विस्ताराची बैठकच झाली रद्द - narendra modi union cabinet expansion meeting canceled | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

नारायण राणे दिल्लीला गेले अन् मंत्रिमंडळ विस्ताराची बैठकच झाली रद्द

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जुलै 2021

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याने भाजपचे खासदार नारायण राणे सकाळी दिल्लीला रवाना झाले होते. 

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ (Union Cabinet) विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याने भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) आज सकाळी दिल्लीला रवाना झाले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बैठक बोलावली होती. परंतु, ही बैठक अचानक रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत पक्षाने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार होणार आहे. यात पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. यात जोतिरादित्य शिंदे, सुशीलकुमार मोदी, सर्वानंद सोनोवाल यांच्यासह महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित आणि  प्रितम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली होती. ही बैठक आता अचानक रद्द करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदल व विस्ताराबाबत चर्चा होणार होती. परंतु, आता ही बैठकच रद्द झाली आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होण्याची चर्चा सुरू आहे. सर्वच नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याचे समजले होते. राणेही आज सकाळी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाली होती. याबद्दल राणे यांनी विचारले असता ते म्हणाले होते की, मी आभार मानतो आणि असे काही घडो आणि तुमच्या तोंडात साखर पडो. जोपर्यंत अधिकृत पत्र येत नाही आणि मी जोपर्यंत शपथ घेत नाही, तोपर्यंत जरा धीर धरा.  

हेही वाचा : तालिका अध्यक्षपदी सोंगाड्याला बसवून खुर्चीचा अपमान; जाधवांवर नितेश राणे घसरले 

पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या आहेत. राज्यातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री  आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील कॅबिनेट मंत्री होते, पण राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर सावंत यांना पक्षाच्या आदेशनांतर  मंत्रिपद सोडावे लागले होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख