तुमची आज खूप आठवण येतेय! मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक - narendra modi remembers ram vilas paswan on his birth anniversary | Politics Marathi News - Sarkarnama

तुमची आज खूप आठवण येतेय! मित्राच्या आठवणींनी मोदी झाले भावुक

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले होते. 

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या जन्मदिनी मित्राच्या आठवणींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज भावुक झाले. आज माझे मित्र रामविलास पासवान यांचा जन्मदिन आहे, त्यांची मला खूप आठवण येते, असे मोदींनी म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे ट्विट अतिशय महत्वाचे आणि सूचक मानले जात आहे. 

लोक जनशक्ती पक्षात फूट पडली असून, यामागे नितीशकुमार यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी रामविलास पासवान यांच्या जन्मदिनी केलेले ट्विट महत्वाचे मानले जात आहे. मोदींनी म्हटले आहे की, आज माझे मित्र रामविलास पासवान यांचा जन्मदिन आहे. मला त्यांची खूप आठवण येत आहे. ते भारतातील अतिशय अनुभवी संसदपटू आणि प्रशासक होते. सामाजिक कार्य आणि तळागाळातील जनतेचे सक्षमीकरण यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. 

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्षात फूट पडली आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. 

बिहारमधील मागील विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी भाजपला विरोध न करता मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा आणि जेडीयूला विरोध अशी भूमिका घेतली होती. स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवून घेणाऱ्या चिराग यांना विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजपने सुशीलकुमार मोदी यांना उभे केले होते. 

हेही वाचा : शिवसेनेशी युतीवर फडणवीसांचे सूचक वक्तव्य 

चिराग यांच्याविरूद्ध पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर या पाच खासदारांनी बंड केले आहे. चिराग यांच्यासह पक्षाचे लोकसभेत सहा खासदार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज होते.  यामुळे पक्षाचे नेते आणि संसदीय नेते अशी दोन्ही पदेही चिराग यांच्याकडून काढून घेण्याची खेळी पारस यांनी खेळली होती. 

पशुपती आणि चिराग यांच्यात मागील काही काळापासून बेबनाव आहे. ते अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नसून, ते पत्रव्यवहाराद्वारे संवाद साधत आहेत. पशुपती हे पहिल्यांदाच खासदार म्हणून हांजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता या काका आणि पुतण्याच्या वादामुळे बिहारमधील राजकारण ढवळले गेले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख