पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीतून मोदी सरकारने 7 वर्षांत कमावले 23 लाख कोटी रुपये

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.
narendra modi government earns 23 lakh crore over fuel price hike
narendra modi government earns 23 lakh crore over fuel price hike

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 2014 पासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ सुरू आहे. यातून मागील 7 वर्षांत मोदी सरकारने 23 लाख कोटी रुपये कमावले आहेत. मागील दोन महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात तीन वेळा वाढ केली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव कमी असला तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दरगगनाला पोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव 90 अथवा 100 डॉलर प्रतिबॉरलवर जातील त्यावेळी देशातील दरांची कल्पनाच करणे अशक्य आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

शेतकरी, नोकरदार आणि कामगारांच्या खिशातून पैसा काढून घेतला जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही उद्योगपतींच्या खिशात घातला जात आहे, असा आरोप करुन राहुल गांधी म्हणाले की, सरकारच्या म्हणण्यानुसार जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल वाढत आहे. एका बाजूला सरकार नोटाबंदी करत आहे तर दुसऱ्या बाजूला सरकारी मालमत्तांची विक्रीकरुन चलनीकरण सुरू आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, असंघटित क्षेत्र, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, कंत्राटी कामगार, नोकरदार, प्रामाणिक उद्योगपती यांची नोटाबंदी केली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या चार ते पाच मित्रांचे मात्र, चलनीकरण सुरू आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. विनाअंशदानित गॅस सिलिंडरसाठी आता 25 रुपये जादा द्यावे लागतील. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com