असं पहिल्यांदाच घडलं...मोदींनी ममतांना फोन केलाच नाही! - narendra modi did not call mamata banerjee about victory in west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

असं पहिल्यांदाच घडलं...मोदींनी ममतांना फोन केलाच नाही!

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. ममता बॅनर्जी यांनी राज्यात विजयाची हॅटट्रिक केली आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. तृणमूलच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, ममतांच्या बंगालमधील विजयानंतर त्यांनी फोन करुन शुभेच्छा न देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 215, भाजप 77 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करीत आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

तृणमूलच्या या विजयावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल अभिनंदन ममतादीदी. केंद्र सरकार पश्चिम बंगालमधील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कोरोना महामारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारला मदत करेल. 

परंतु, या वेळी मोदींनी ममतांना विजयाबद्दल फोन केला नाही. दरवेळी पश्चिम बंगालमधील विजयानंतर मोदी हे ममतांना आवर्जून फोन करुन शुभेच्छा देत असत. या वेळी मात्र, मोदींनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी थेट ममतांना फोन करुन शुभेच्छा देणे टाळले आहे. खुद्द ममतांनीच याची माहिती दिली आहे. 

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 

एक्झिट पोलपेक्षाही ममतांची कामगिरी सरस 
एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या लढतीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, तृणमूलला 149 जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. याचवेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला 116 जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 16 जागा मिळतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख