उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी मोदींचा विश्वासू चेहरा उतरणार मैदानात

उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आताच पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
narendra modi close aid a k sharma get big role in uttar pradesh
narendra modi close aid a k sharma get big role in uttar pradesh

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Election) भाजपने आताच पावले उचलण्यास सुरवात केली आहे.  राज्यातील कोरोना संकट हाताळण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अपयशी ठरले असून, त्यांच्या जागी नवीन चेहरा येईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, पक्ष नेतृत्वाने त्यांना हटवण्याची चर्चा फेटाळून लावली आहे. याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) निकटवर्ती व माजी सनदी अधिकारी ए.के.शर्मा (A.K.Sharma) यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत असून, राज्यातील जनतेत सरकारबद्दल असलेल्या नाराजीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरा येईल, अशी चर्चा होती. परंतु, योगींना कायम ठेवण्यात आले आहे. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनाही बदलण्यात येणार नाही. या ऐवजी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे येतील. उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणे समोर ठेवून त्यांची निवड होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

मोदींचे विश्वासू ए.के.शर्मा यांच्यावर उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नेमकी त्यांच्यावर कोणती जबाबदारी असेल, हे पक्षाने स्पष्ट केले नाही. मात्र, त्यांच्यावर अतिशय महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारही शर्मांकडे सोपवले जातील, असे समजते. मोदींनीच आता उत्तर प्रदेशात थेट लक्ष घातल्याचे हे निदर्शक आहे. त्यांच्या निकटवर्तीयाला उत्तर प्रदेशात पाठवून त्यांनी सर्व सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका हा संघपरिवाराने राजकीयदृष्ट्या प्राधान्यक्रमावरील विषय ठेवला आहे. या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नुकतीच महत्वाची ऑनलाइन बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थिती होती. 

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे. याचबरोबर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. यातच कोरोना संकट हाताळण्यातील चुकांमुळे जनतेत नाराजी आहे. त्यामुळे संघाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. देशातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक 2024 मधील केंद्र सरकार कुणाचे असेल, हे दर्शविणारी असेल. 

पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे निकाल आणि उत्तर प्रदेश पंचायत निवडणुकांमध्ये भाजपची झालेली वाताहत यावर बैठकीत चर्चा झाली होती. उत्तर प्रदेशात कोरोना दुसरी लाट असतानाही नियम धाब्यावर बसवून पंचायत निवडणुका घेतल्या. त्यात भाजपची सुमार कामगिरी झाली. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पुढील वर्षी निवडणुका असताना उत्तर प्रदेशात कोरोनाच्या प्रकोपासमोर योगी सरकार हतबल झाले आहे. गंगेच्या पात्रावर मृतदेह तरंगू लागले आहेत. ही धोक्याची घंटी मानून भाजपने लवकरात लवकर उपाययोजना सुरू कराव्यात, अशी सूचना संघाने केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com