बिहारमधील स्टार प्रचारकांच्या यादीत नरेंद्र मोदी, स्मृती इराणी अन् फडणवीस - narendra modi and smriti irani will be star campaigner of bjp in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमधील स्टार प्रचारकांच्या यादीत नरेंद्र मोदी, स्मृती इराणी अन् फडणवीस

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, भाजपने आज 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 

नवी दिल्ली : बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपने आज बिहारमधील निवडणुकीसाठी 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते व बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

भाजपने आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, डॉ. संजय जयस्वाल, सुशीलकुमार मोदी, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, राधामोहनसिंह, रविशंकर प्रसाद, गिरीराजसिंह, स्मृती इराणी, अश्वनीकुमार चौबे, नित्यानंद राय, आर.के.सिंह, धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, रघुवर दास, मनोज तिवारी, बाबूलाल मरांडी, नंदकिशोर यादव, मंगल पांडे, रामकृपाल यादव, सुशीलसिंह, छेदी पासवान, संजय पासवान, जनक चमार, सम्राट चौधरी, विवेक ठाकूर आणि निवेदिता सिंह यांचा समावेश आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख