मोदी-शहांचा आषाढीनिमित्त मराठीतून सुखद धक्का..! - narendra modi and amit shah wish on occasion of aashdhi ekadashi | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी-शहांचा आषाढीनिमित्त मराठीतून सुखद धक्का..!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जुलै 2021

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वारकरी बंधू -भगिनींना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. 

नवी दिल्ली : आषाढी वारीवर (Aashadhi Wari) यंदा कोरोना महामारीचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर थेट वारीत जाण्याऐवजी वारकरी घरातूनच लाडक्या विठुरायाची आठवण काढत आहेत. आजच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी वारकरी बंधू -भगिनींना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. 

मोदी आणि अमित शहा यांनी ट्विटरवर आषाढी एकादशीनिमित्त मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी म्हटले आहे की, आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा.  सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी  विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून   समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.

शहांनी म्हटले आहे की, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। करावा विठ्ठल जीवभाव॥ टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलभक्तांची पायी वारी व संत संप्रदायाच्या शिकवणीचा महान वारसा असलेली वारकरी परंपरा अशीच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छेसह सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल…श्री ज्ञानदेव तुकाराम!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज करण्यात आली. महापूजेनंतर मुख्यमंत्री म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे.

या वेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा माझा विश्वास आहे.

मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते (वय ७१, जि. वर्धा) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते इंदूबाई केशव कोलते (वय ६६) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख