नारायण राणेंच्या एंट्रीने पहिल्याच दिवशी मंत्रालयात उडाली तारांबळ  - Narayan Rane takes charge of Cabinet Ministry | Politics Marathi News - Sarkarnama

नारायण राणेंच्या एंट्रीने पहिल्याच दिवशी मंत्रालयात उडाली तारांबळ 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

नारायणे राणे यांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळी पदभार घेतला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे खासदार नारायण राणे यांनाही स्थान मिळालं आहे. त्यांच्याकडे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी आज या खात्याचा पदभार स्वीकारला आहे. आक्रमक नेते म्हणून ओळख असलेल्या राणेंनी आज त्याची झलक पहिल्याच दिवशी दाखवली. मंत्रालयात पदभार घेतल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. (Narayan Rane takes charge of Cabinet Ministry)

नारायणे राणे यांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळी पदभार घेतला. राज्यात त्यांनी मुख्यमंत्रीपदासह अनेक खाती सांभाळली आहेत. त्यामुळं त्यांना प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्याचीच प्रचिती आज पाहायला मिळाली. मंत्रालयात पदभार घेण्यासाठी आल्यानंतर राणेंनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना थेट खात्याशी संबंधित प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्यामुळं अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

हेही वाचा : पदभार घेताच आयुष मंत्री म्हणाले, कोरोनापासून बचावासाठी मोदींचा योगा महत्वाचा!

मंत्रालयाचे जीडीपीमध्ये योगदान किती, दोन वर्षात मंत्रालयाने किती रोजगार उपलब्ध केले, भेटण्यासाठी आलेल्या एकाही अधिकाऱ्याच्या हातात फाईल का नाही, ही माहिती कोण देणार आहे, अशा प्रश्नांची राणे यांनी अधिकाऱ्यांवर सरबत्ती केली. अनेक अधिकारी सुट्टीवर असल्यांचं उत्तर उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलं. तसेच अधिकारी आल्यानंतर ही सर्व माहिती देऊ, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर राणेंचं समाधान झालं नाही. त्यांना फैलावर घेत राणे यांनी लग्नासाठी किती कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत, असा प्रश्न केला. त्यावर उपस्थित सर्वच अधिकारी शांत राहिले. आज संध्याकाळपर्यंत सर्व माहितीसह उपस्थित राहण्याची सूचना राणे यांनी देताच अधिकारी कामाला लागले. चांगले काम केले नाही तर सर्व अधिकाऱ्यांना बदलले जाईल, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.  

दरम्यान, राणे यांच्यासह डॅा. भारती पवार, डॅा. भागवत कराड आणि कपिल पाटील यांनीही आपल्या खात्याचा पदभार आज स्वीकारला. पवार यांना आरोग्य राज्यमंत्री, कराडांना अर्थ राज्यमंत्री तर पाटील यांना पंचायत राज राज्यमंत्री पद मिळालं आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्राला चार मंत्रिपद मिळाली आहेत. त्यापैकी राणे कॅबिनेट तर अन्य तिघे राज्यमंत्री झाले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख