राणे म्हणाले, शरद पवारांचा फोन आला पण उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही! - narayan rane says sharad pawar congratulated him but uddhav thackeray not | Politics Marathi News - Sarkarnama

राणे म्हणाले, शरद पवारांचा फोन आला पण उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

माजी मुख्यमंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. 

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री व भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला. पदभार स्वीकारताच राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मला शरद पवारांनी (Sharad Pawar) फोन केला पण उध्दव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नसल्यामुळे त्यांनी मला फोन केला नाही, असा टोला राणेंनी लगावला. 

केंद्रीय कॅबिनेटमध्ये नारायण राणे यांना कुठले खाते मिळते याची उत्सुकता सगळ्यांना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय मिळेल अशी चर्चा होती परंतु राणेंकडे आता  सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

राणेंनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी बोलताना ते म्हणाले की, मला शरद पवारांनी अभिनंदनाचा फोन केला होता. त्यांनी मला चांगले काम करण्याचा सल्ला दिला. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनाचा फोन केला नाही. कारण त्यांचे मन एवढे मोठे नाही. 

हेही वाचा : थपथ घेतल्यानंतर जोतिरादित्य शिंदेंच्या फेसबुकवर काँग्रेसचे कौतुक अन् मोदींवर टीका! 

महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार निवडून येऊनही भाजपला सत्ता मिळाली नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी करीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. यामुळे अस्वस्थ असलेल्या भाजप नेतृत्वाने राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन शिवसेनेला इशारा दिला आहे. याचबरोबर  पुढील काळात शिवसेना आणि भाजप हे  एकत्र येतील ही शक्यताही मावळली आहे. राणे यांनी मंत्री म्हणून पहिल्यांदाच बोलतानाच ठाकरे यांना लक्ष्य केले.  

दरम्यान,  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मिळालेले खाते त्यांच्या कारकिर्दीला साजेसे नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर राणे म्हणाले की, कोणतेही खाते छोटे अथवा मोठे नसते. मी या खात्याचा कार्यभार पाहून, या खात्याला न्याय देईन. त्यावेळी त्यांना कळेल की हे खाते किती महत्वाचे असते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख