नशीबवान आमदार नारायण कुचेंना मतदारसंघातील अडचणींचे आव्हान ?

संतोष सांबरे यांना पर्याय म्हणून सध्या औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे सुपूत्र ऋषीकेश खैरे यांच्या नावाची देखील बदनापूर मतदारसंघात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आघाडी होणार असे बोलले जाते. पण आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीकडून गेल्यावळी चांगली लढत देणारे बबलू चौधरी तर कॉंग्रेसकडून सुभाष मगरे मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे.
 नशीबवान आमदार नारायण कुचेंना मतदारसंघातील अडचणींचे आव्हान ?

बदनापूर : शिवसेना-भाजपने अचानक युती तोडल्यावर 2014 मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढलेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत अवघ्या तेरा दिवसात आमदार झालेले बदनापूरचे विद्यमान भाजप आमदार नारायण कुचे यांना 2019 मध्ये मतदारांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या तालुक्‍यात शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सक्षम उमेदवार पुढे आल्यास कुचे यांना निवडणूक कठीण जाऊ शकते असे बोलले जाते. 

पुर्वीच्या बदनापूर आणि आताच्या बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजपचा प्रभाव राहिला आहे. शिवसेनेचे नारायण चव्हाण हे या मतदारसंघातून तीनवेळा तर संतोष सांबरे हे दोनदा विजयी झाले आहेत. 2004 मध्ये राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण यांचा अपवाद वगळता बदनापूर मतदारसंघ हा शिवसेना-भाजपच्या विचारांचा राहिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देखील लोकसभा निवडणुकीत बदनापूरमधूनच पन्नास हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते 

शिवसेना-भाजपची युती तुटली आणि या दोन्ही पक्षाचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले. ऐनवेळी भाजपला उमेदवार शोधण्यासाठी बरीच धावाधाव करावी लागली आणि अखेर औरंगाबादहून उमेदवार आयात करावा लागला. भाजपचे प्रेदशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे समर्थक आणि औरंगाबाद महापालिकेतील नगरसेवक, स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांची लॉटरी लागली. देशात व राज्यात उसळलेल्या मोदी लाटेत अवघ्या तेरा दिवसांत नारायण कुचे आमदार झाले. 

शिवसेनेचे संतोष सांबरे मैदानात असले तरी त्यांना पक्षातील नाराजीचा फटका बसला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर राष्ट्रवादीच्या बबलू चौधरी यांचा 23 हजार मतांनी पराभव करत कुचे विधानसभेत पोहचले. मी नशिबाने आमदार झालो हे नारायण कुचे खाजगीत कबूल करतात. 

तीन वर्षात केवळ आश्‍वासने 

राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यामुळे बदनापूर विधानसभा मतदारसंघाचा झपाट्याने विकास होईल अशी आशा लोक बाळगून होते. जिल्ह्यात कॅबिनेट, राज्यमंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतांना देखील मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याची ओरड लोक करत आहेत. मतदारसंघात आमदार नारायण कुचे यांचा जनसंपर्क असला तरी प्रत्यक्षात कामांपेक्षा आश्‍वासनांवरच त्यांचा भर राहिल्याची टिका देखील त्यांच्यावर केली जाते. 

मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून कोट्यावधींच्या रस्त्याच्या कामांची उद्‌घाटने झाली, पण प्रत्यक्षात रस्त्यांची आजही दयनीय अवस्था आहे. 1992 मध्ये बदनापूर तालुक्‍याची निर्मीती झाली. तेव्हापासून येथील नागरिक बसस्थानकाची मागणी करत आहेत, पण अद्याप तालुक्‍याला चांगले बसस्थानक मिळू शकलेले नाही याबद्दल मतदारसंघात नाराजी दिसून येते. 

तालुक्‍याची लोकसंख्या वाढली पण त्या तुलनेत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवी योजना आणण्यात देखील विद्यमान आमदारांना अपयश आले आहे. 1992 ची पाणीपुरवठा योजना असून नसल्या सारखी आहे. त्यामुळे तालुक्‍यातील जनतेला आठ दिवसाआड पाणी मिळते. एकीकडे विकासकामांना खीळ तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या आर्शिवादाने तालुक्‍यात अवैध धंद्याना ऊत आल्याचे बोलले जाते. 

सत्तेचा गैरवापर? 
आमदार नारायण कुचे यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप देखील केला जातो. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, नातेवाईकांची इच्छित ठिकाणी वर्णी लावण्यासाठी यंत्रणेवर दबाव आणल्याचे प्रकार देखील त्यांच्याकडून घडल्याची चर्चा आहे. एकंदरित बदनापूर मतदारसंघात भाजप विरोधात सक्षम पर्याय उपलब्ध झाल्यास वेगळे चित्र दिसू शकते. 

तिरंगी लढतीची शक्‍यता 
बदनापूर मतदारसंघात आगामी निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे. शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याने उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. विद्यमान भाजप आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी असली तरी सध्या तरी भाजपकडून दुसरे नाव समोर येतांना दिसत नाहीये. शिवाय विद्यमान आमदारांची उमेदवारी कापली जाणार नाही असे देखील सांगितले जाते. 

शिवसेनेकडून पुन्हा एकदा माजी आमदार संतोष सांबरे यांचे नाव पुढे येत असले तरी शिवसैनिकांमध्ये त्यांच्या बद्दल असलेली नाराजी कायम दिसते. सांबरे यांच्याऐवजी शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला तर बदनापूरमध्ये शिवसेना पुनरागमन करू शकते अशी परिस्थीती आहे. जिल्हा परिषदेत तालुक्‍यातील 4 सर्कलमध्ये तर पंचायत समितीच्या 10 पैकी सहा जांगासह पंचायत समिती शिवसेनेने ताब्यात घेतली आहे. सेनेला पोषक वातावरण असल्यामुळे योग्य उमेदवार दिल्यास बदनापूरमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकू शकतो. 

संतोष सांबरे यांना पर्याय म्हणून सध्या औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांचे सुपूत्र ऋषीकेश खैरे यांच्या नावाची देखील बदनापूर मतदारसंघात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेसची आघाडी होणार असे बोलले जाते. पण आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीकडून गेल्यावळी चांगली लढत देणारे बबलू चौधरी तर कॉंग्रेसकडून सुभाष मगरे मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com