नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील नेत्यांसोबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत चर्चा केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी अनुकूल असले तरी राज्यातील नेत्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव लावून धरले आहेत. पटोले यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात असले तरी ते मंत्रिपदासाठी अडून बसल्याने अंतिम निर्णयाला विलंब लागत आहे. याबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधी या घेणार असून, उद्या (ता.2) याची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी आता सोनिया गांधींनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्यातील नेत्यांशी या संदर्भात कालच (31 जानेवारी) चर्चा केली. या चर्चेत नाना पटोले यांच्या नावावर चर्चा झाली. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात आहे मात्र, त्यांनी प्रदेशाध्यक्षपदासोबत सार्वजनिक बांधकाम अथवा ऊर्जा मंत्रालयाची मागणी केली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांना दुहेरी जबाबदारी देण्यास नकार दिला आहे. या अनुषंगाने सोनिया गांधींनी राज्यातील काँग्रेसच्या आठ वरिष्ठ मंत्र्यांशी दिल्लीत चर्चा केली.
पक्षाचे विदर्भातील नेते पटोले यांच्या बाजूने नाहीत. राज्याच्या मंत्रिमंडळातील ओबीसी चेहरा असलेले विदर्भातील नेते विजय वडेट्टीवर यांच्या मागे विदर्भातील नेते उभे आहेत. याचवेळी अशोक चव्हाण आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे वडेट्टीवार यांच्या बाजूने आहेत. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पटोले यांच्या बाजूने झुकलेले आहेत. यामुळे अंतिम निर्णय सोनिया गांधी याच घेतील. उद्या पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचा आढावा नुकताच राज्यातील नेत्यांकडून पक्ष नेतृत्वाने घेतला होता. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतही या बैठकीत चर्चा झाली होती. या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी आज पक्षाच्या सर्व मंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली होती. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, सुनील केदार, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
बैठकीनंतर बोलताना प्रभारी एच. के.पाटील यांनी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा लवकरात लवकर होईल, असे जाहीर केले होते. विधानसभा अध्यक्ष बदलणार काय, या प्रश्नावर आताच काही बोलता येणार नाही, असे म्हणत पाटील टाळाटाळ केली होती. परंतु, बाळासाहेब थोरात ज्येष्ठ असतील तर नवा अध्यक्ष तरुण असेल आणि बाळासाहेब तरुण असतील तर नवा अध्यक्ष ज्येष्ठ असेल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली होती. माझ्याकडे असलेल्या प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद आणि विधिमंडळ नेतेपद या कामांची विभागणी होणार असेल आणि तरुण माणसाकडे जबाबदारी दिली जात असेल तर चांगलेच आहे, असेही थोरात म्हणाले होते.
Edited by Sanjay Jadhav

