ग्लोबल टेंडर काढूनही भारताला लस मिळणार नाही; केंद्राच्या तज्ञ गटाच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण - n k arora says global tenders cannot get vaccine for india | Politics Marathi News - Sarkarnama

ग्लोबल टेंडर काढूनही भारताला लस मिळणार नाही; केंद्राच्या तज्ञ गटाच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
शनिवार, 15 मे 2021

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. परंतु, देशात लशीची टंचाई निर्माण झाली आहे. 

नवी दिल्ली :  देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, देशात मोठ्या प्रमाणात लशीची टंचाई निर्माण झाली आहे. यावर केंद्र सरकारच्या कोविड 19 तज्ञ गटाचे प्रमुख डॉ.एन.के.अरोरा यांनी सरकारलाच जबाबदार धरले. याचबरोबर ग्लोबल टेंडर (Global Tender) काढल्यानंतरही लस मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. अरोरा म्हणाले की, केंद्र सरकारने मृत्यूदर कमी करण्यासाठी लस देण्याचे प्राधान्यक्रम ठरवले. यात वयोगट निश्चित करुन लस देण्यात येत आहे. परंतु, सरकारने सर्वांनाच लस देण्याचा निर्णय घेतला आणि देशात लस टंचाई झाली. आधीच्या वयोगटांतील नागरिकांना देण्यासाठी आजही पुरेशी लस उपलब्ध आहे. सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लस देऊन लस टंचाई ओढवून घेतली. हा निर्णय सरकारने काही दिवस पुढे ढकलायला हवा होता. 

मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात प्राधान्यक्रम ठरवण्यात आला होता. लसीचा तातडीचा उद्देश हा मृत्यूदर कमी करणे हा होता. यात सर्वाधिक धोका असणाऱ्या नागरिकांना आधी लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 45 वर्षांवरील नागरिक, फ्रंटलाईन वर्कर यांची निवड करण्यात आली. आताचा विचार केला तरी या वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी पुरेशी लस जुलैपर्यंत उपलब्ध होईल, असे डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले. 

आपण ग्लोबल टेंडर काढली की आपल्याला लस मिळेल, हा समज चुकीचा आहे. जगात कुठेही मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नाही. लस उपलब्ध असली तरी त्या लस उत्पादक कंपन्यांनी आधीच अनेक देशांशी करार केले आहेत. अनेक बड्या देशांनी आधीच या कंपन्यांशी करार त्यांचे हात बांधून टाकले आहेत, असे अरोरा यांनी नमूद केले. 

हेही वाचा : कोरोनाच्या भारतीय प्रकारावरील लशीची परिणामकारकता अनिश्चित : डब्लूएचओ 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख