मुंबईत कोरोना मृतांच्या आकडेवारीचा पुन्हा घोळ  - Mumbai Corona Numbers Not Matching | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबईत कोरोना मृतांच्या आकडेवारीचा पुन्हा घोळ 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

६ ऑगस्टपर्यंत घाटकोपरमध्ये ३६७  मृत्यू झाल्याची नोंद होती. ७ ऑगस्टला तब्बल ५७७  मृत्यू दाखविण्यात आले. त्यानंतर ८ ऑगस्टला जाहीर केलेल्या आकडेवारीत ३७२  मृत्यू दाखविण्यात आले. दरम्यान, या घोळाबाबत पालिकेकडून कोणाताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

मुंबई  : शहरात कोरोना मृतांच्या आकडेवारीचा घोळ पुन्हा सुरू झाला आहे. पालिकने ७ ऑगस्टपर्यंत घाटकोपर एन प्रभागात ५७७  मृत्यू झाल्याची माहिती जाहीर केली होती. त्यानंतर ८ ऑगस्टला ३७२  मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे आकडेवारीबाबत पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.

महापालिका प्रभागनिहाय मृतांची आकडेवारी मे महिन्यापर्यंत जाहीर करत नसे. कोरोना संसर्गावर नियंत्रण येण्यास सुरुवात झाल्यानंतर पालिकेने विभागवार मृतांची आकडेवारी जाहीर करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार ६ ऑगस्टपर्यंत घाटकोपरमध्ये ३६७  मृत्यू झाल्याची नोंद होती. ७ ऑगस्टला तब्बल ५७७  मृत्यू दाखविण्यात आले. त्यानंतर ८ ऑगस्टला जाहीर केलेल्या आकडेवारीत ३७२  मृत्यू दाखविण्यात आले. दरम्यान, या घोळाबाबत पालिकेकडून कोणाताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

पाच प्रभागांत मृत्युदरात वाढ
पूर्व उपनगरातील मुलुंड टी प्रभागात मृत्युदर २.९४  टक्‍क्‍यांवरून ३.१७  टक्के झाला आहे. भांडुप एस प्रभागात मृत्युदर ६.२१ वरून ६.२८  टक्के झाला आहे. बोरिवली आर मध्य येथे ३.२५  वरून ३.४०  टक्के, कांदिवली आर दक्षिण येथे २.८६ टक्‍क्‍यांकरून ३.२७  टक्के, तर लालबाग परळ एफ दक्षिणमध्ये ५.७२ टक्के मृत्युदर झाला आहे.

तीन प्रभागांत दिलासा
चेंबूर, सांताक्रूझ आणि कुर्ला येथे मृत्युदरात घट झाली आहे. चेंबूर एम पश्‍चिम प्रभागात मृत्युदर ७.६३ टक्के आहे. एच पूर्व वांद्रे सांताक्रूझ पूर्व भागात ७.६० टक्के, कुर्ला एल प्रभागात ७.४९ टक्के मृत्युदर आहे. २३ जुलै रोजी एम पश्‍चिमचा मृत्युदर ८.३० टक्के, तर एच पूर्वचा मृत्युदर ८.२६ टक्के होता.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख