वेळ पडल्यास तलवारी काढू! संभाजीराजेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा - mp sambhjraje chhatrapati warns state government over maratha rerervation issue | Politics Marathi News - Sarkarnama

वेळ पडल्यास तलवारी काढू! संभाजीराजेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूरातून आज सुरूवात झाली. 

तुळजापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण पेटले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मराठा संघटनांनी लावून धरली. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आज तुळजापुरातून सुरुवात झाली. या वेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा सरकारला दिला. 

मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर येत्या १५ ऑक्टोबरला आंदोलन करणार असल्याची घोषणाही संभाजीराजे यांनी या वेळी केली. ते म्हणाले की, संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू. आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. 

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूरमधून सुरुवात झाली. या वेळी खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. 

संभाजीराजे म्हणाले की, शाहू महाराजांनी १९०२ मध्ये पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होण्याची गरज आहे. मराठा समाजात ८० टक्के लोक हे गरीब आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, बारा बलुतेदारी टिकली पाहिजे. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत. मी यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही दिसत नाही. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजप पुरस्कृत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यावर असलेली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठली पाहिजे ही आमची मागणी आहे. राज्य सरकारने त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. मुख्यमंत्र्यांची भेट झाली तेव्हा समाज तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे मी त्यांना सांगून आलो आहे. आरक्षणाच्या या लढ्यात समाजाला ताकद देण्यासाठी तुळजा भवानीचा आशिर्वाद मागायला आलोय, असेही संभाजीराजे यांनी सांगतिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख