खबरदार...जर एमपीएससी परीक्षा घ्याल; संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा - mp sambhjraje chhatrapati warns state government against conducting mpsc exam | Politics Marathi News - Sarkarnama

खबरदार...जर एमपीएससी परीक्षा घ्याल; संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा

तुषार रुपनवर
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण पेटले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सरकारी नोकरभरती आणि एमपीएससी परीक्षा घेण्यास विरोध होत आहे. 

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारने या परीक्षा घेतल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. 

खासदार संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाला मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणा वाढला. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला मी तयार आहे. मला सर्वांनी सांगितले की, तुम्ही नेतृत्व करा परंतु, मी सगळ्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. मराठा समाजाने काढलेल्या ५८ मोर्चांची दखल देशाने नव्हे तर जगाने घेतली आहे. 

मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास म्हणून सिद्ध केले आहे. आपण आर्थिक दुर्बल घटकात जाऊ असे काही जण म्हणत आहेत. माझे त्या सर्वांना आव्हान आहे की, त्यांनी समाजाची जबाबदारी घ्यावी. मराठा समाजाच्या मुलांचे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.  

राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी राज्य सरकार पूर्ण का करीत नाही, असा सवाल करुन संभाजीराजे म्हणाले की, राज्य सरकारने सारथी संस्था बुडीत काढली. मराठा आरक्षणाची जबाबदारी सर्व आमदारांची आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो त्यावेळी सर्व ओबीसी मंत्री उपस्थित होते. मराठा आमदार मात्र, शांत बसले आहेत की त्यांना बोलता येत नाही. मराठा आमदार मात्र, पुढाकार घेताना दिसत नाहीत. 

एमपीएससी परीक्षा झाल्या तर वाईट परिणामांना सरकारला सामोरे जावे लागेल. राज्यात ११ ऑक्टोबरला एमपीएससी परीक्षा केंद्रे बंद पाडण्यात येतील. मी संभाजीराजे  छत्रपती म्हणून सांगतोय की मी मराठा समाजासाठी लढा देणार आहे. संभाजीराजे संयमी आहे असे अनेकांना वाटते. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी आता संयम सोडेन. आमचे छत्रपतींचे रक्त आहे. पहिला वार मी खायला तयार आहे, असा इशारा त्यांनी दिला. 

आम्हाला ओबीसी समाजाला धक्का द्यायचा नसून, आम्हांला एसईबीसीचे आरक्षण घ्यायचे आहे. आमचे ओबीसी नेत्यांना एकच म्हणणे आहे की, तुम्ही आमच्या मध्ये येऊ नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख