संभाजीराजेंना बोलू देण्यासाठी संजय राऊतांनी चढवला आवाज

घटनादुरूस्तीचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. संभाजीराजे यांना सुरूवातीला त्यावर बोलण्याची संधी देण्यात आली नाही.
MP SambhajiRaje talks about 127th constitutional amendment
MP SambhajiRaje talks about 127th constitutional amendment

नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी १२७ व्या घटनादुरुस्तीचे विधेयक चर्चेसाठी सादर करण्यात आले होते. अनेक सदस्यांनी यावरी चर्चेत सहभाग घेतला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या विधेयकावर बोलण्याची संधी मागितली होती. मात्र, सुरूवातीला त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आवाज चढवत त्यांना बोलू देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत संभाजीराजेंना बोलण्याची परवानगी देण्यात आली. (MP SambhajiRaje talks about 127th constitutional amendment)

घटनादुरूस्तीचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. बुधवारी हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आले. चर्चेअंती हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. या विधेयकावर दुपारनंतर चर्चेला सुरूवात झाली. या विधेयकावर बोलण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनीही परवानगी मागितली होती. पण राज्यसभा अध्यक्षांनी सुरूवातीला ही परवानगी दिली नव्हती. 

संभाजीराजे यांना राज्यसभेत बोलण्याची संधी मिळावी यासाठी खासदार राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी पीठासीन अध्यक्षांकडे जोरदार मागणी केली. 'संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांना बोलू द्या,' असे त्यांनी अध्यक्षांना सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनीही राऊत यांचं नाव घेत दोन मिनिटे बोलण्याची परवानगी दिली. 'सर्व खासदारांनी या विधेयकावरील माझे मत ऐकण्याची इच्छा असल्याचे एकमुखाने व्यक्त केले व यासाठी आवाज उठवला. त्यानुसार या विधेयकावर राज्यसभेत मत मांडले,' असं संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

खासदार संभाजीराजे यांचे राज्यसभेतील संपूर्ण भाषण :

मी सरकारचे मनापासून आभार मानतो, की त्यांनी १०२ व्या घटना दुरुस्तीत योग्य सुधारणा करून राज्यांना अधिकार बहाल करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत.

प्रथमतः मला अभिमानाने सांगायचे आहे, की माझे पणजोबा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापूर राज्यात १९०२ साली बहुजनांना आरक्षण दिले. त्यात एससी, एसटी, ओबीसी आणि मराठ्यांनादेखील आरक्षण देऊन सर्वांना एका छताखाली आणले होते. नंतर हेच धोरण भारतीय संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केले.

मी ह्या समाजाचा एक घटक म्हणून, राज्याला पुन्हा अधिकार बहाल करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. स्वागत करीत असताना मी नमुद करू इच्छितो कि केवळ राज्याला अधिकार दिल्याने समाजाला आरक्षण मिळाले, असे होत नाही. मला चिंता वाटत आहे, जर राज्य सरकार मराठ्यांना एसईबीसी म्हणून घोषित करते, परंतु त्याच वेळी आरक्षणाचा ५०% कोटा आधीच राज्याने वापरलेला आहे. आणि इंद्रा सहानी  केसचा निकाल म्हणतो की, राज्यामध्ये असामान्य परिस्थिती असल्याशिवाय ५०% मर्यादा ओलांडून आरक्षण देता येणार नाही. मग अशा समाजांना आरक्षणाचा लाभ कसा घेता येईल?

मी पाहिले आहे, की बऱ्याच राज्यांमध्ये विविध सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजांना अतिरिक्त आरक्षण देण्याची गरज आहे. म्हणूनच या देशाची महान विविधता लक्षात घेऊन हा मुद्दा हाताळला पाहिजे. म्हणूनच मी या विधेयकात दोन सुधारणा प्रस्तावित करीत आहे:

१. काही राज्यांमध्ये कदाचित दुर्गम (Far Flung) परिथिती नसतील म्हणून, इंद्रा सहानीच्या निर्णयामध्ये ५०% मर्यादा ओलांडण्याची एक असामान्य (extraordinary) परिस्थिती मानली गेली, तरीही काही समाजातील लोकसंख्या अपवादात्मक कारणांमुळे मुख्य प्रवाहातून वगळली जाऊ शकते, त्यामुळे राज्यांना या निकषांना असामान्य (extraordinary) मानण्याची परवानगी दिली गेली पाहिजे.

२. ज्या राज्यांना सामाजिक मागास प्रवर्ग सिद्ध करता येत असतील, त्या राज्यांना ५०%ची मर्यादा ओलांडून आरक्षण देता यावे, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. "

१२७ व्या घटनादुरूस्ती विधेयकामुळे एखादा समाज मागास ठरवून त्याला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना परत मिळणार आहे. हे विधेयक लोकसभेमध्ये सर्वपक्षाच्या सदस्यांनी एकमताने मंजूर केले आहे. राज्यसभेमध्ये सुध्दा सर्वांनी याचे समर्थन केले आहे. सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो, कि या ऐतिहासिक घटनेचा मी फक्त साक्षीदारच नव्हे तर, या संपूर्ण प्रक्रियेचा एक घटक म्हणून सहभागी होतो. या निमित्ताने मराठा समाजाची बाजू संसदेत अधिक प्रखरपणे मांडू शकलो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com