जॉगिंग ट्रॅक उघडण्यासाठी खासदारांचे केंद्र सरकारला पत्र - MP letter to central government to open jogging track | Politics Marathi News - Sarkarnama

जॉगिंग ट्रॅक उघडण्यासाठी खासदारांचे केंद्र सरकारला पत्र

वृत्तसंस्था
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

सोशल डिस्टन्सिंग, मास्क, तपासणी आदी उपाय योजून आम्ही पोयसर जिमखान्याचा जॉगिंग ट्रॅक व्यायामपटूंसाठी खुला केल्याचेही त्यांनी पत्रात दाखवून दिले आहे.

मुंबई  : महाराष्ट्र सरकारने जॉगिंगला संमती दिली असली तरी अद्याप संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे कॉलनीतील जॉगिंग ट्रॅक व्यायामपटूंसाठी खुले केले नाहीत, अशी तक्रार उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे.

कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यावर गेल्या चार पाच महिन्यांपासून हे उद्यानही व्यायामपटूंना बंद करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने अनलॉकिंगमध्ये जॉगिंगला आणि मोकळ्यावरील व्यायामाला संमती दिली आहे. मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे कॉलनीतील जॉगिंग ट्रॅक अजूनही व्यायामपटूंसाठी  बंद आहेत.

तेथील रहिवाशांना येण्याजाण्यासाठी त्याचा वापर करता येतो, मात्र, तेथे बाहेरील व्यायामपटू व रहिवासी येऊ शकत नाही. तेथील सुरक्षा रक्षक बाहेरील रहिवाशांना अडवतात. यासंदर्भात शेट्टी यांनी यापूर्वी समाजमाध्यमांवर व्हिडियो टाकून हे जॉगिंग ट्रॅक उघडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्याने त्यांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना पत्र लिहिले आहे.

नुकतीच राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने शेट्टी तसेच बोरीवलीचे आमदार सुनील राणे आदींनी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनेही केली होती. गेले दोन महिने शेट्टी यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली हवी व त्यासाठी त्यांना मोकळ्या, शुद्ध हवेत व्यायाम करून ऑक्सिजन मिळू शकतो.

मुंबईत एरवीही प्रदूषणाचे प्रमाण मोठे असल्याने उलट या जंगल पट्ट्यात व्यायाम केल्याने नागरिकांचा लाभच होईल. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, तपासणी आदी उपाय योजून आम्ही पोयसर जिमखान्याचा जॉगिंग ट्रॅक व्यायामपटूंसाठी खुला केल्याचेही त्यांनी पत्रात दाखवून दिले आहे.

संबंधित लेख