मॉन्सून आला रे...दोन दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल - monsoon reach two day before schedule in maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

मॉन्सून आला रे...दोन दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जून 2021

केरळ, कर्नाटकनंतर मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान आहे. 
 

मुंबई : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (Monsoon) वेगाने प्रवास सुरू आहे. यामुळे केरळ, कर्नाटकनंतर आज मॉन्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दोन दिवस आधीच दाखल झाला. दक्षिण कोकणातील हर्णे, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि मराठवाड्याच्या काही भागांत मॉन्सूनने हजेरी लावली. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान आहे, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

यावर्षी मॉन्सून सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. यंदा अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशिराने मॉन्सून दाखल झाला होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या यास चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा वेग काही काळ वाढला होता. मॉन्सून नियमित वेळेच्या म्हणजेच १ जूनच्या आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता होती. परंतु, पोषक वातावरण नसल्याने मॉन्सूनचे केरळमधील आगमन लांबले होते. 

नियमित वेळेच्या दोन दिवस उशिरा मॉन्सून दक्षिण केरळमध्ये दाखल झाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली. संपूर्ण केरळसह, कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भाग मॉन्सूनने व्यापला. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून सर्वसाधारणपणे 7 जूनच्या सुमारास दाखल होतो. पोषक हवामान असल्याने तो दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. 

हेही वाचा : लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदी झाले गायब अन् अवतरल्या ममता!

महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह, ईशान्य भारतात आज (ता. ६) मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शनिवारपर्यंत संपूर्ण कर्नाटक, गोव्यासह, महाराष्ट्राच्या काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांतील हर्णेसह सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागांसह कर्नाटकातील कर्नुल, तिरुपती, कुड्डालोरपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे. 

मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची तारीख 
वर्ष  : दाखल 
२०१६ : १९ जून 
२०१७ : ८ जून 
२०१८ : ८ जून 
२०१९ : २० जून 
२०२० : ११ जून 
२०२१ : ५ जून 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख