मोदी सरकारसाठी राज्यसभेत आता आरपारची लढाई - modi government prepared for passage of agriculture bills in rajya sabha | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारसाठी राज्यसभेत आता आरपारची लढाई

मंगेश वैशंपायन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकांवरुन देशभरात संताप पसरला असला तरी मोदी सरकारने ही विधेयके संमत करण्यासाठी चंग बांधला आहे. सरकारने यासाठी अगदी आरपारची लढाई असल्याप्रमाणे तयारी केली आहे. 

नवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. मोदी सरकारने ही विधेयके संमत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ही बहुचर्चित तीन कृषी विधेयके उद्या (ता. 20) राज्यसभेत मांडण्याचे नियोजन आहे.

भाजप व काँग्रेस या दोन्ही आघाड्यांमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांनी लोकसभेप्रमाणेच भूमिका कायम ठेवली तर विधेयकांची वाटचाल सुरळीत असेल. मतविभाजन झाले तरी 100 विरूध्द 120-122 अशा फरकाने सत्तारूढ भाजप  ही वादग्रस्त विधेयके राज्यसभेच्या वादळातूनही सुरक्षित तारून नेण्याची  चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व भाजपने आपापल्या खासदारांना उद्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. 

भाजपप्रणित एनडीएकडे राज्यसभेत आजही बहुमत नाही. सत्तारूढ भाजप आघाडीतील अकाली दल आणि तेलंगण राष्ट्र समितीसारख्या मित्रपक्षांनीही या विधेयकाला जाहीर विरोध केला आहे. अकाली दल (3 खासदार) वगळता भाजपला मदत करणाऱ्या एकाही पक्षाचा ठाम विरोध दिसत नाही. या विधेयकांवरून केवळ एनडीएमध्ये वाद आहेत असे नव्हे तर, काँग्रेस व तृणमूलच्या संसदीय नेत्यांमध्येही वाद आहेत. समाजवादी पक्ष व द्रमुकसारखे काँग्रेसच्या बाजूने असणारे पक्षही राज्यसभेत काँग्रेसला नेहमीच अनुकूल भूमिका घेत नसल्याचे या अधिवेशनात अनेकदा समोर आले आहे. 

कोरोना प्रार्दुभावाच्या काळात होणाऱ्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांतील व गॅलऱ्यांमध्येही खासदारांची आसन व्यवस्था केलेली आहे. विविध कारणांमुळे सुमारे 20 ते 25 सर्वपक्षीय खासदार अनुपस्थित आहेत. या पार्श्‍वभूमीवर चर्चा व या विधेयकांना राज्यसभेची मंजुरी वादळी ठरणार आहे. खासदारांची बसण्याची व्यवस्थाच अशी आहे की आवाजी मतदानानंतरही डावे किंवा इतरांनी मतविभाजनाचा हट्ट धरला तर मतविभाजन हे यंत्रांद्वारे घेणे शक्‍य नाही.  त्यामुळे मतपत्रिकांद्वारेच मतदान घ्यावे लागेल. त्यासाठीही लोकसभा सचिवालयाच्या मनुष्यबळाची मदत लागेल. 

लोकसभेत सभात्याग करणाऱ्या शिवसेनेचे राज्यसभेतील सदस्य संजय राऊत यांच्यासह 3 खासदार उद्या ठाम विरोध करण्याची भूमिका घेऊ शकतात. बिजू जनता दल, बहुजन समाज पक्ष व तेलंगण राष्ट्र समितीने विरोधाची ठाम भूमिका घेतली तरी उद्या हे पक्ष सभात्यागाचा मार्गानेच जाऊ शकतात ,असे सांगितले जाते. तेलंगण राष्ट्र समितीच्या भूमिकेत तर लोकसभा विरूध्द राज्यसभा असे मतभेद समोर येत आहेत. 

पक्षीय बलाबल : 
बाजूने : एनडीए : भाजप - 86 , अण्णाद्रमुक- 9 , जदयू- 5 , (बीपीएफ, एमएनएफ, एनपीपी, एपीएफ, लोकजनशक्ती पक्ष, रिपब्लिकन, एसडीएफ) - एकूण 7, (अपक्ष व नामनिर्देशित)- 6, वायएसआर कॉंग्रेस- 6 
विरोधात : यूपीए : काँग्रेस- 40 , तृणमूल- 13, समाजवादी पक्ष- 8, राष्ट्रीय जनता दल- 5, आम आदमी पक्ष- 3, (एमडीएमके, तेलगू देसम, माकप, मुस्लिम लीग, आरएसपी, केरळ कांग्रेस एम,, पीएमके, पीडीपी)- एकूण 8 ते 9 , राष्ट्रवादी कॉंग्रेस 4, सीपीएम- 5, द्रमुक- 7, अकाली दल- 3, शिवसेना -3. 
भूमिका अस्पष्ट असणारे : आसाम गण परिषद- 1, बसप- 4, बीजू जनता दल- 9, तेलगणा राष्ट्र समिती- 7 (3 अनुपस्थित), 1 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख