कंगनाच्या विरोधात आता मनसे आक्रमक - आपल्या राज्यातच राहण्याचा 'सल्ला' - MNS Aggressive over Kangana Ranaut statement about Mumbai Police | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाच्या विरोधात आता मनसे आक्रमक - आपल्या राज्यातच राहण्याचा 'सल्ला'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

मुंबईत आहात म्हणून सुरक्षित आहात. PoK मध्ये असता तर बोलायचं कसं तेही कळलं असतं, फालतू राजकारणासाठी मुंबईची बदनामी सहन केली जाणार नाही असे मत माणसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी व्यक्त केलंय आणि कंगनाची वक्तव्याचा निषेध केलाय.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.  माझ्या मुंबई पोलिसांबद्दल मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व चित्रपट आघाडीचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कंगनाला आपल्या राज्यातच राहण्याचा 'सल्ला' दिला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगनाने बाॅलीवूडबाबत उघड भूमीका घेतली आहे. बाॅलीवूडमधील ड्रग माफियांविरोधातही तिने भाष्य केले होते. त्यानंतर एक ट्वीट करत तिने संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, आपल्याला केंद्र सरकार किंवा हरयाणा सरकारने सुरक्षा पुरवावी असे म्हणत तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेणार नाही, असे जाहीर केले होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी देत, मुंबईला येऊ नये असे सांगितले आहे, असा आरोप अभिनेत्री कंगना राणावत हिने काल केला. 'मुंबई पाकव्याप्त काश्मीर प्रमाणे का वाटते? असा सवालही केला आहे. कंगनाने ट्वीट करुन राऊत यांच्यावर हा आरोप केला होता. 

महाराष्ट्रातील एका सत्ताधारी नेत्याने अभिनेत्री कंगना राणावत हिला तू मुंबईत येऊ नको म्हणत धमकवण्याचे दुःसाहस केलं आहे. कंगनाच्या तोंडून सुशांतसिंह प्रकरणातील काही नावे बाहेर येतील व आपली अडचण होईल यामुळे तिला धमकवण्याचं कट कारस्थान आहे, असा संजय राऊत यांच्यावर थेट आरोप करीत कंगनाच्या पाठीमागे देश उभा आहे, असे म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी तिला पाठींबा दर्शवला. त्यावरुन आता भाजप व काँग्रेस यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाले आहेत. 

दरम्यान, मुंबईत आहात म्हणून सुरक्षित आहात. PoK मध्ये असता तर बोलायचं कसं तेही कळलं असतं, फालतू राजकारणासाठी मुंबईची बदनामी सहन केली जाणार नाही असे मत माणसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी व्यक्त केलंय आणि कंगनाची वक्तव्याचा निषेध केलाय.

अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. "माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जनमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये. मुंबईत आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी जातात, याला कारण आहेत माझे मुंबईचे पोलिस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो...कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलिस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित रहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला...पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीह बरगळलेलं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही." असे खोपकर यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख