आमदार बरे व्हावेत, म्हणून आरती, यज्ञ - MLAs should be healed from Corona, hence Aarti | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार बरे व्हावेत, म्हणून आरती, यज्ञ

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

गणेशोत्सवाच्या धामधुमीत सुर्वे यांना कोरोना झाल्याचे कळल्यावर मागील आठवड्यात त्यांना वॉकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई : कोरोनाग्रस्त असलेले मागठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे बरे होऊन लवकर घरी यावेत, यासाठी मतदारसंघात अनंत चतुर्दशीपर्यंत महाआरत्या झाल्या तर आता अनेक ठिकाणी यज्ञ होत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत सुर्वे यांना कोरोना झाल्याचे कळल्यावर मागील आठवड्यात त्यांना वॉकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती चांगली आहे, मात्र ते लवकर घरी यावेत म्हणून अनंतचतुर्दशी पर्यंत अनेक ठिकाणी महाआरत्या झाल्या. 

सिंग इस्टेट रहिवासी सेवा संघातील ज्येष्ठ नागरिकांनी कांदीवलीत तसेच श्री श्रद्धा मित्र मंडळ, गोकुळ नगर सार्वजनिक उत्सव मंडळ, गोकुळ नगर रहिवासी सेवा संघ, अमर आनंद मित्र मंडळ, शिवसेना शाखा क्रमांक 12, सावरपाड्याचा राजा मित्रमंडळ आदींनी ठिकठिकाणी महाआरत्या केल्या. सुर्वे बरे व्हावेत, असे गाऱ्हाणे यावेळी गणरायाला घालण्यात आले. 

काही मंडळांनी तर सुर्वे घरी परत येत नाहीत. तोपर्यंत गणरायाचे विसर्जन न करण्याचे ठरविले. अनंतचतुर्दशीनंतरही रोज गणपतीची पूजा, आरती करण्याचीही त्यांची तयारी होती. मात्र ही बाब सुर्वे यांना कळताच त्यांनी या कार्यकर्त्यांना अडवले. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी आपल्या धार्मिक प्रथा बदलू नका, मी लवकरच परत येईन, असे त्यांनी कार्यकर्त्यांना कळवले. विभागातील नगरसेविका माधुरी भोईर यांच्यातर्फे सार्वजनिक होमहवनही करण्यात आले.

हेही वाचा : आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण 

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरी मतदार संघातील आमदार सुनील टिंगरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत टिंगरे यांनी टि्वट करून याबाबतची माहिती दिली आहे. टिंगरे यांना दोनतीन दिवसापूर्वी ताप आला होतो. त्यांची कोरोनाची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी टि्वटमध्ये आहे की कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी करण्यात आली आणि माझा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की कृपया लक्षणे आढळल्यास लगेच चाचणी करावी, आणि विलगीकरणाचे नियम पाळावे.काल वडगाव शेरी येथे गॅस सिलिडरचा स्फोट झाला होता. या घटनेची पाहणी करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे त्याठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक आणि अन्य कार्यकर्ते होते. यावेळी सामाजिक सुरक्षा पाळण्यात आली नव्हती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख