#मराठा आरक्षण ; काँग्रेसने शिखंडीला पुढे करून "आदर्श" चेहरा पुढे आणला.. - MLA Vinayak Mete criticism about Maratha reservation   | Politics Marathi News - Sarkarnama

#मराठा आरक्षण ; काँग्रेसने शिखंडीला पुढे करून "आदर्श" चेहरा पुढे आणला..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

आम्ही मागील ३० वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत,  हे लक्षात आल्यावर काँग्रेसने मागील काही दिवसांपासून शिखंडीला पुढे करून आपला खरा "आदर्श" चेहरा पुढे आणला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आम्ही मागील ३० वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, आणि आपण काहीच करत नाहीत, हे लक्षात आल्यावर काँग्रेसने मागील काही दिवसांपासून शिखंडीला पुढे करून आपला खरा "आदर्श" चेहरा पुढे आणला आहे. म्हणूनच काल झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये "सुतावरून स्वर्ग" गाठण्याचा प्रयत्न केला असल्याची खरमरीत टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. 
         

विनायक मेटे म्हणाले की काँग्रेसने काल सर्वोच्च न्यायालयामध्ये 'आम्ही सुनावणी सुरु असताना कलम १०२ च्या घटनादुरुस्तीचा विषय आवश्यक नसताना तो मुद्दाम काढला गेला. आणि आरक्षणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.  आणि विनायक मेटे हे कुणाच्या इशाऱ्यावर हे करत आहेत, तसेच श्रेयासाठी ते हे करत आहेत' असे बिनबुडाचे आरोप केले गेले. त्यावर मी एवढेच म्हणेन कि, काँग्रेसने आणि काँग्रेसच्या स्वयंघोषित अति विद्वान प्रवक्त्यांनी मराठा आरक्षण काय आहे ? ते कसे मिळाले?, कोणत्या कायद्यानुसार मिळाले, माननीय उच्च न्यायालयामध्ये कोणते प्रश्न समोर आले, माननीय उच्च न्यायालय निकाल देताना काय म्हणाले ?, तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाबाबत विरोधकांनी कोणकोणते आक्षेप घेतले आहेत, त्यांच्या वकिलांनी कोणते मुद्दे उपस्थित केलेले आहेत, याची माहिती आपल्या शासनाच्या वकिलांकडून माननीय ऍड मुकुल रोहतगी किंवा माननीय ऍड पटवालिया यांच्याकडून घेतली असती तर बरे झाले असते, म्हणजे "आदर्श" विचाराने चाललेल्या स्वंयघोषीत अति विद्वान प्रवक्ते यांना तोंडघशी पडावे लागले नसते, असे विनायक मेटे यांनी म्हटले आहे. 
  

शिवसंग्रामच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये ३ याचिका दाखल केल्या आहेत. १) मूळ मराठा आरक्षणाला समर्थन देणारी हस्तक्षेप याचिका, २) मराठा आरक्षण घटनापीठाकडे पाठवावी, व्हीसीद्वारे सुनावणी घेऊ नये आणि सर्व आरक्षणाच्या याचिका एकत्र करून त्यासोबतच मराठा आरक्षणाची सुनावनी घ्यावी, ३) १०२ च्या घटना दुरुस्तीबाबत. ऍड मुकुल रोहतगी यांनी तर सुनावणीदरम्यान आपला युक्तिवाद करताना अर्ध्यापेक्षा जास्त वेळ कलम १०२ व्या घटनादुरुस्तीबाबतच केले होते, म्हणजे सरकाच्या वकिलांच्या युक्तिवादाला पण काँग्रेसचे स्वयंघोषित "आदर्श" विचाराचे पाईक असणारे विद्वान प्रवक्ते विरोध करत आहेत, कलम १०२ व्या घटनादुरुस्तीने ३३८ बी व ३४२ अ हि कलमे वाढवण्यात आलेली आहेत. आणि मराठा आरक्षणामध्ये या दोन्ही कलमांच्या इंटरप्रेटेशनचा प्रश्न न्यायालयासमोर आहे, अन तो महत्वाचा आहे. 
  

आमच्या शिवसंग्रामच्या वतीने वकिलाने कोणताही चुकीचा युक्तिवाद केला नाही, आणि त्यामुळे मराठा आरक्षणाला अडचण नाही तर मोठी मदत होणार आहे.  आरक्षण याचिका घटनापीठाकडे पाठविण्यात आलेली आहे. आणि तसाच आपलाही विषय आहे. असेच आमचे वकील सांगत होते. पण आम्ही "आदर्श" विचार किती भोंगळ आहेत, आणि त्यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन मराठा समाज राहिला तर समाजाचा घात होईल, म्हणून असले "आदर्श" विचार फेकून द्या, असे म्हणत होतो. त्याचा राग काही "आदर्श" विचारवंतांना आल्यामुळे आम्हाला बदनाम करण्याची सुपारी स्वयंघोषित बुद्धिमान लोकांनी घेतलेली आहे. पण आम्ही असल्या लोकांना आजीबात भीक घालत नाहीत, असेही मेटे म्हणाले. 
     

मेटे म्हणाले कि, आम्ही अगोदर अखिल भारतीय मराठा महासंघ आणि आता मागील २० वर्षांपासून शिवसंग्रामच्या माध्यमातून असे एकूण ३० - ३५ वर्षांपासून मराठा समाजाचे आमच्या परीने कार्य करण्याचे प्रयत्न करत आहोत, आणि शेवटपर्यंत करत राहुत. पण काँग्रेसच्या "आदर्श" विचारांचे आणि त्या विचाराने चालणाऱ्यांनी मराठा समाजामध्ये जन्म घेण्याव्यतिरिक्त कोणते समाजाचे कार्य केले हे हि जाहीरपणाने एकदा तरी सांगावे. नाहीतर आम्ही "आदर्शवादीच" आहोत आणि राहणार हे जाहीरपणाने सांगावे. आम्ही स्व विलासरावजी देशमुख साहेब यांचे मराठा आरक्षणाबद्दलचे योगदान, स्व शिवाजीराव देशमुख, स्व पतंगराव कदम यांचेही योगदान कधीही विसरणार नाहीत. हे सर्व आदरणीय मंडळी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करत होते, आपल्यासारखे बेगडी "आदर्श" विचारांचे नव्हते. 
   

मेटे यांनी सांगितले कि, आमचे सर्वोच्च न्यायालयामधील सर्व अर्ज आणि युक्तिवाद आम्ही कुणालाही दाखवायला तयार आहोत, देण्यास सुद्धा तयार आहोत. म्हणजेच खरे कोण आणि खोटे कोण हे समाजाला कळेल. म्हणूनच काँग्रेसच्या आदर्शवादी विचारांच्या शिखंडीला पुढे करून समाजाची दिशाभूल करणे थांबवावे. कायद्याचे अर्धवट ज्ञान आणि काँग्रेसचा मराठा आरक्षणाबाबत असलेल्या उदासीन प्रवृत्तीचा "आदर्श" चेहरा आता उघड झाला आहे. असो तूर्तास एवढेच असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख