दोन्ही काॅंग्रेसला झोडपणाऱ्या तानाजी सावंतांची शिवसंपर्क अभियानाला मात्र दांडी!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आदेशही सावंत पाळेनात?
Tanaji Sawant
Tanaji Sawantsarkarnama

उस्मानाबाद : शिवसंपर्क अभियानाला उस्मानाबाद संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी त्यांच्याच जिल्ह्यात गैरहजेरी लावल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सोलापूरमध्ये युवासेना निश्चय मेळाव्यात राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसला काल (ता. 29) झोडून काढणाऱ्या सावंतांनी शिवसंपर्क अभियानाला का बरे दांडी मारली, याविषयी तर्क लावण्यात येत आहेत. `मातोश्री`हून येणारे आदेश पाळतो म्हणणारे सावंत स्वतःच्या जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानामध्ये स्वतःहून फिरकले नाहीत की त्यांनी येऊ नका, असे कोणी सांगितले, याचीही चर्चा आहे. याबाबत आमदार तानाजी सावंत यांच्याकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन स्वीकारला नाही.

सामान्य माणसाचे प्रश्न काय आहेत? ते जाणून घेणे, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना केल्यानंतर शहरी भागातील प्रत्येक वॉर्ड तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक पंचायत समिती गणातमध्ये जाऊन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क करण्यास सुरवात केली.

Tanaji Sawant
वरुण सरदेसाईंना वाघनखे भेट दिली आणि तानाजी सावंतांनी पंजा मारला...

उस्मानाबाद जिल्ह्यात खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने खासदार लोखंडे यांनी जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब या तालुक्यांमध्ये हजेरी लावून शिवसंपर्क अभियान राबविले. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यासोबत आमदार तानाजी सावंत असणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यातील कोणत्याच कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे खासदार लोखंडे परंडा मतदारसंघात हे अभियान राबविताना सहकार्यही झाले नसल्याचे शिवसैनिक दबक्या आवाजात बोलत आहेत. त्यामुळे शिवसंपर्क अभियानातून आमदार सावंत यांचा संपर्क केव्हाच तुटला असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये होत आहे.

Tanaji Sawant
आमचा एकच बसला तर तुम्हाला आईचे दूध आठवेल : तानाजी सावंतांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अडीच वर्षापूर्वी मंत्रीपद न मिळाल्याने आमदार सावंत यांची भूमिका कायमच संशयाच्या भोवर्‍यात उभी राहिली. कधी स्वपक्षातील नेत्यावर तर कधी महाविकास आघाडीतील नेत्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांनी टीका केली. याशिवाय जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणात भाजपसोबत हातमिळवणी केली. यामध्ये पुतण्याला उपाध्यक्ष म्हणूनही संधी दिली. शिवसेनेला त्रासदायक ठरणाऱ्या त्यांच्या पवित्र्यांने जिल्ह्यातील शिवसैनिक पुरते हैराण झाले. आपण केवळ मातोश्रीचे आदेश पाळतो म्हणणारे आमदार सावंत शिवसंपर्क अभियानामध्ये मात्र दिसले नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या मतदारसंघात तर शिवसंपर्क अभियान अगदी एक-दोन ठिकाणी पाहायला मिळालं. शहरी भागातील प्रत्येक वॉर्ड अथवा जिल्हा परिषदेच्या गणापर्यंत जाऊन पक्षाची आणि सरकारची भूमिका मांडवी अशा सूचना मातोश्रीवरून आल्या होत्या. मात्र मातोश्रीच्या या अभियानाला कोलदांडा केल्याने आमदार सावंत यांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Tanaji Sawant
Video : शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत दोन्ही काँग्रेसवर चिडले

पक्षाकडून एकवेळा मंत्रीपद, सध्या आमदारकी, पुतण्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुलगा जिल्हा बँकेत संचालक अशा विविध पातळ्यावर पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. असे असतानाही जर पक्ष कार्यासाठी मातोश्रीचा आदेश मानला जात नसेल तर अशा नेत्यांचा पक्षाला काय उपयोग? अशी भावना शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. आता पुढील काळात आमदार सावंत काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष असणार आहे. दरम्यान याबाबात आमदार सावंत यांच्याशी सपर्क केला. मात्र त्यांनी फोन स्विकारला नाही. शिवाय त्यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनाही संपर्क केला. मात्र त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com