अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी 'सीआयडी' चौकशीची माहिती द्या : प्रताप सरनाईक यांचे पत्र - MLA Pratap Sarnaik Demands information about Anvay Naik Case Investigation | Politics Marathi News - Sarkarnama

अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी 'सीआयडी' चौकशीची माहिती द्या : प्रताप सरनाईक यांचे पत्र

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

५ मे २०१८ ला मौजे कावीर, ता. अलिबाग येथे आर्किटेक्‍ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या वतीने प्रथम खबर अहवाल पोलिसात देण्यात आला होता. या प्रकरणाची 'सुसाईड नोट' पोलिसांना प्राप्त झाली असून या प्रकरणी रितसर गुन्हाही दाखल झालेला आहे. या तपासाची माहिती देण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे

ठाणे  : मुंबईतील मराठी आर्किटेक्‍ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा २०१८ मध्ये अलिबाग येथे मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून एक सुसाईड नोटही घटनास्थळी सापडली होती. तसेच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश देखील देण्यात आले; परंतु अद्यापही योग्य ती कारवाई झाली नसल्याचे दिसून येत असून नाईक कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नाईक आत्महत्येप्रकरणी करण्यात येत असलेल्या सीआयडी चौकशीची माहिती मिळावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

५ मे २०१८ ला मौजे कावीर, ता. अलिबाग येथे आर्किटेक्‍ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या वतीने प्रथम खबर अहवाल पोलिसात देण्यात आला होता. या प्रकरणाची 'सुसाईड नोट' पोलिसांना प्राप्त झाली असून या प्रकरणी रितसर गुन्हाही दाखल झालेला आहे. मे महिन्यात अन्वय नाईकच्या पत्नीने व मुलीने या प्रकरणाच्या तपासाबाबत गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी २६ मे २०२० रोजी एक ट्विट करून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सीआयडीने चौकशीचे पुनर्आदेश देण्यात आल्याचे घोषित केले होते.

ज्या पद्धतीने सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचत असते, तशीच माहिती गृहमंत्री या नात्याने अन्वय नाईक प्रकरणाची माहिती जनतेला प्रसार माध्यमातून मिळावी, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. अन्वय नाईक प्रकरणाची सीआयडीची चौकशी पूर्ण झाली का? झाली असेल तर तपासाची सद्यस्थिती काय आहे? याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळणे गरजेचे असल्याचे आमदार सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

नाईक प्रकरणाबाबत आपणास पत्र दिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेच्या प्रतिक्रिया '#justiceforanvaynaik' या हॅशटॅग माध्यमातून ट्विटरवर ट्रेंड होत आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सीआयडी चौकशीची घोषणा झाली असली तरी आर्किटेक्‍ट अन्वय नाईक यांनाही न्याय देण्यासाठी सरकारने हालचाली कराव्यात, अशी मागणी देखील आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख