शेतकऱ्यांना ' साले' म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात मी लोकसभा लढवणार- आमदार बच्चू कडू

परभणी, वर्धा आणि जालना या तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा, अशी मागणी त्या त्या भागातील कार्यकर्ते व शेतकरी बच्चू कडू यांच्याकडे करत आहेत असे समजते .
शेतकऱ्यांना ' साले' म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात मी लोकसभा लढवणार- आमदार बच्चू कडू
Danve-Kadu.

औरंगाबाद   : " 'एव्हढी तूर खरेदी करूनही रडतात साले ' असे  म्हणत राज्यातील समस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना मतदारसंघातून मी  निवडणूक लढविणार आहे ," असे आमदार बच्चू कडू यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले . 


 जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना दानवे यांनी दिलेली शिवी शेतकरी विसरलेला नाहीत. त्यांच्याविषयी शेतकऱ्यांत अजूनही प्रचंड रोष आहे.त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत दानवेंचा पराभव करा आणि शेतकऱ्यांच्या अपमानाचा बदला घ्या असा आग्रह शेतकरी व कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यावर मी नक्कीच विचार करत असे   आमदार बच्चू कडू यांनी सांगितले . 

19 फेब्रुवारी रोजी सेलू येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमदार बच्चू कडू आले होते. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता.बच्चू कडू हे विदर्भातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर त्यांचे काम संपुर्ण राज्यात सूरू आहे. 

शेतीमालाला हमीभाव, बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कापूस खरेदी, तूर खेरदीसह शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील प्रश्‍नावर बच्चू कडू नेहमीच सभागृहात आक्रमपणे बाजू मांडतात. प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांग व्यक्तीचे प्रश्‍न देखील त्यांनी धसास लावल्याची कार्यकर्ते व शेतकऱ्यांची भावना आहे.

साले विषयाशिवाय   पैठण जवळ हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी पोलीसांकडून झालेल्या गोळीबारावर देखील दानवे यांनी "गोळ्या छातीवर नाही तर पायवर घालायला हव्या''असे वादग्रस्त विधान केले होते. याची आठवण शेतकरी व कार्यकर्त्यांनी सेलूच्या बैठकीत बच्चू कडू यांना करून दिली. या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी तसेच दानवे यांची मतदारसंघातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी गळ त्यांना कार्यकर्त्यांनी घातली आहे.

कार्यकर्त्यांचा मागणीवर आपण सकारात्मक विचार करत असून निवडणूक लढवण्या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे बच्चू कडू यांनी सांगितले. बच्चू कडू यांना सर्वपक्षांकडून ऑफर येत असल्याचे देखील बोलले जाते. परभणी, वर्धा आणि जालना या तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा, अशी मागणी त्या त्या भागातील कार्यकर्ते व शेतकरी बच्चू कडू यांच्याकडे करत आहेत असे समजते . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in