नवीन कार्यकारिणी जाहीर करुन लोणीकरांचे दानवेंना थेट आव्हान

जालन्यात भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याविरोधात पक्षातील नेत्यांनीच थेट भूमिका घेतली आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी आता पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करुन दानवेंना थेट आव्हान दिले आहे.
mla bababanrao lonikar announces new executive members fo bjp for jalna district
mla bababanrao lonikar announces new executive members fo bjp for jalna district

जालना :  भाजपची जालना जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष व आमदार संतोष दानवे यांनी काल जाहीर केली होती. या कार्यकारीणीत दानवे गटातील सर्वाधिक सदस्यांना स्थान मिळाल्याने आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर गट कमालीचा नाराज झाला होता. दरम्यान, आज जिल्हा कार्यालयात आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर, मंठा तालुक्यातील कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक घेउन आणखी एक कार्यकारिणी जाहीर केली आहे. 

जालना जिल्ह्यात भाजप नेते व  केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे हे हुकूमशाही गाजवत असल्याचा आरोप भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपमध्ये हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, दानवे यांच्या हुकूमशाहीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी केला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात दानवे गटाविरुद्ध आमदार बबनराव लोणीकर गट असा संघर्ष पेटला आहे. 

रावसाहेब दानवे यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे जालना जिल्हा परिषद दोन वेळा भाजपच्या ताब्यात आली नाही. ते स्वतः केंद्रीय मंत्री, मुलगा जिल्हाध्यक्ष आमदार, भाऊ पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यांसह अनेक महत्वाची पदे  त्यांनी घरातच ठेवली आहेत, असा गंभीर आरोप ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री दानवे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये राहावे की नाही हे एकदा स्पष्ट करावे, असा उद्विग्न सवालही शेजुळ यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे यांची हुकूमशाही प्रवृत्ती वाढत चालली असून, त्यांच्या हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीच्या माध्यमातून भाजपचे अतोनात नुकसान होत आहे. रात्रंदिवस पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर डावलले जात आहे. आपल्या मर्जीतील आणि हुजरेगिरी करणार्‍या कार्यकर्त्यांना आणि आपल्याच कुटुंबातील लोकांना पक्षात महत्वाची  पदे दिली जात आहेत, असे शेजुळ यांनी म्हटले आहे. आम्ही फक्त सतरंज्या उचलायचा का ? असा सवालही त्यांनी केला.

आज जिल्हा कार्यालयात आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर, मंठा तालुक्यातील कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक घेउन आणखी एक कार्यकारिणी जाहीर केली आहे. जिल्हाध्यक्ष आणि आमदार संतोष दानवे यांनी एकतर्फी निर्णय घेऊन काल कार्यकारिणी जाहीर केल्याचा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे. सध्या जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून कार्यकर्ते प्रचंड संतापले असून, लोणीकर आणि दानवे यांच्यातील अंतर्गत वादाबरोबरच कुरघोडी या बैठकीवरुन समोर आली आहे.

जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत भोकरदन,  जाफराबाद, जालना, बदनापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा अधिक भरणा असून, लोणीकर यांनी परतूर आणि मंठा ,जालना या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा अधिक भरणा जिल्हा कार्यकारिणीत केला आहे. दरम्यान आज निवड झालेल्या कार्यकर्त्यांची यादी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवणार असल्याचे राहुल लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले  आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com