मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये दाखल झालेले मिथुन चक्रवर्तींचा अखेरच्या क्षणी पत्ता कट - mithun chakraborty name missing from final list of bjp in west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये दाखल झालेले मिथुन चक्रवर्तींचा अखेरच्या क्षणी पत्ता कट

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मार्च 2021

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांना विधानसभेचे तिकिटच मिळाले नाही. 

कोलकता : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा गाजावाजा करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांना विधानसभेचे तिकिटच मिळाले नाही. भाजपने पश्चिम बंगाल विधानसभेसाठी उमेदवारांची शेवटची यादी जाहीर केली असून, त्यात मिथुन यांचे नाव नसल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.  

भाजपने आज 13 उमेदवारांची यादी जाहीर केली. ही भाजपची शेवटची यादी मानली जात आहे. मिथुन यांच्यासाठी रासबिहारी हा मतदारसंघ राखीव ठेवला जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, भाजपने लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) सुब्रत साहा यांनी तेथून उमेदवारी दिली आहे. काश्मीरमधील संघर्षाच्या काळात साहा तेथे नियुक्तीस होते. यामुळे मिथुन हे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता मावळली आहे.  

ब्रिगेड मैदानावर मिथून चक्रवर्ती यांनी नुकताच भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील घरी जाऊन मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली होती. तेव्हाच मिथुन यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे औचित्य साधून मिथुन यांनी पक्षप्रवेश केला होता. 

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 70 वर्षीय अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. 'मी एक नंबरचा कोब्रा आहे, डसलो तर तुम्ही फोटो बनाल,' असे डायलॉग बोलत मिथुन यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटांतील काही डायलॉगही बोलून दाखविले. 

त्यावेळी बोलताना मिथुन यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते की, 'मी बंगाली असल्याचा गर्व आहे. मला माहित आहे की, लोकांना माझे डायलॉग आवडतात. माझा नवीन डायलॉग आहे, मी प्युअर कोब्रा आहे. मी डसलो तर तुम्ही फोटो बनाल. आमचा हक्क कुणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास मी फणा काढेन.  भाजपमध्ये प्रवेश करणे हा स्वप्न साकार झाल्यासारखे आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर आहे.

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांची राजकीय वाटचाल 2014 मध्ये सुरूच झाली होती. ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये 34 वर्षांचा डाव्या पक्षांचा गड उध्वस्त करत राज्यात तृणमूलची सत्ता आणली. यावेळी बंगालमध्ये ममतादीदींची लोकप्रियता खूप वाढली होती. सत्तेत आल्यानंतर ममतांनी मिथुन चक्रवर्ती यांना राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले. ममतादीदींची लोकप्रियता पाहून मिथुन यांनी हे आमंत्रण स्वीकारत राजकारणात प्रवेश केला. त्यांना लगेच राज्यसभेचे तिकीटही मिळाले. तृणमूलकडून राज्यसभा खासदार म्हणून ते निवडून गेले. पण केवळ अडीच वर्ष ते खासदार राहिले. या अडीच वर्षांच्या काळात केवळ तीन दिवस ते संसदेत उपस्थित होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख