तलवारीच्या भाषेवरुन संभाजीराजे अन् वडेट्टीवार आमनेसामने

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे आणि मंत्री विजय वडेट्टीवार आमनेसामने आले आहेत.
minister vijay wadettiwar criticizes mp sambhajiraje over maratha reservation
minister vijay wadettiwar criticizes mp sambhajiraje over maratha reservation

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण पेटले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मराठा संघटनांनी लावून धरली होती. संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे. यावरुन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी संभाजीराजेंना प्रत्युत्तर दिले आहे. 

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आज तुळजापुरातून सुरुवात झाली. या वेळी खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर येत्या १५ ऑक्टोबरला आंदोलन करणार असल्याची घोषणाही संभाजीराजे यांनी या वेळी केली. ते म्हणाले की, संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहीत आहे. गरज पडेल तेव्हा तलवारी काढू. आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. 

संभाजीराजे म्हणाले की, शाहू महाराजांनी १९०२ मध्ये पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होण्याची गरज आहे. एकूण ८० टक्के मराठा समाज गरीब आहे. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत. मी यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही दिसत नाही. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजप पुरस्कृत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संभाजीराजेंच्या वक्तव्याला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजा हा समाजाचा नसतो तर रयतेचा असतो. तलवार कोणाविरोधात उपसणार आहात. शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले. हे राजकारण कशासाठी सुरू आहे.. एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे नुकसान होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी करावी.

तलवारीची भाषा नको तर तडजोडीची भाषा असली पाहिजे. एमपीएससी परीक्षेत २०० जागा असून, त्यात २३ जागा मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. परीक्षा व्हावी असे माझे मत आहे, मात्र त्यात कोणत्याही समाजाचे नुकसान होऊ नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com