नवी दिल्ली : मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे आता राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश पुढील आठवड्यात होणार आहेत. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी श्रीधरन हे मुख्यमंत्रिपदासह सर्वच पदांसाठी योग्य उमेदवार आहेत, असे सूचक वक्तव्य केले आहे.
ई.श्रीधरन हे पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच श्रीधरन यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षात प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने भाजपमधील काही नेतेही खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनीच श्रीधरन हे पक्षात प्रवेश करणार असल्याबाबतची घोषणा केली होती. श्रीधरन यांनीही त्यास दुजोरा दिला होता. या पार्श्वभूमीवर श्रीधरन म्हणाले होते की, भाजपची इच्छा असल्यास मी केरळ विधानसभा निवडणूक लढेन. तसेच, पक्षाने विचारल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासही माझी तयारी आहे. केरळमध्ये भाजप सत्तेवर आल्यास पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. याचबरोबर राज्याला कर्जमुक्त करण्यावर भर दिला जाईल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात विजययात्रा काढली आहे. या वेळी बोलताना सुरेंद्रन म्हणाले की, श्रीधरन हे भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. यातून राज्यातील जनता सरकारला किती कंटाळली आहे, हे दिसून येत आहे. सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) आणि विरोधी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांची भूमिका विकासविरोधी आहे. श्रीधरन हे मुख्यमंत्रिपदासह सर्वच पदांसाठी योग्य उमेदवार आहेत. ते कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. पुढील काही दिवसांत अनेक बड्या व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या ८८ वर्षांच्या श्रीधरन यांनी राज्यपालपदात कोणताही रस नसल्याचे सांगितले आहे. राज्यपाल हे पद संपूर्णपणे घटनात्मक आहे. या पदावरून राज्याच्या विकासासाठी भरीव कार्य करता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
केरळमध्ये सध्या डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एलडीएफ) सरकार आहे. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यू़डीएफ) विरोधात आहे. मागील अनेक वर्षे राज्यात या दोन्ही आघाड्यांकडे सत्ता राहिली आहे. राज्यात भाजपचे स्थान अगदी नगण्य आहे. श्रीधरन यांनी पक्षात प्रवेश केल्यास फायदा होईल, असा भाजपचा कयास आहे.
Edited by Sanjay Jadhav

