नवीन इनिंगसाठी मेट्रोमॅनने 24 वर्षांनंतर अखेर दिल्ली मेट्रोचा गणवेश काढला!

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
metro man e sreedharan wears delhi metro uniform for last time
metro man e sreedharan wears delhi metro uniform for last time

नवी दिल्ली : मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे आता राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. त्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. श्रीधरन यांची राजकीय इनिंग सुरु होण्यासोबत त्यांची दिल्ली मेट्रोतील इनिंग मात्र, संपली आहे. त्यांनी शेवटच्या वेळीस दिल्ली मेट्रोचा गणवेश घालून अखेर निरोप घेतला आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल केरळमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. 

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबतच्या श्रीधरन यांच्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा शेवट अखेर झाला आहे. श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोचा गणवेश घालण्याचा कालचा (ता.4) शेवटचा दिवस होता. त्यावेळी ते म्हणाले की, दिल्ली मेट्रोचा गणवेश परिधान करण्याचा हा माझा शेवटचा दिवस आहे. पलारीवट्टम उड्डाणपुलाचे पुनर्बांधकाम गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हाती घेण्यात आले होते. आता तो तयार झाला असून, त्याचे उद्घाटन कधी करायचे याचा निर्णय राज्य सरकार घेईल. दिल्ली मेट्रोचा गणवेश मी पहिल्यांदा नोव्हेंबर 1997 मध्ये परिधान केला. मागील 24 वर्षे मी हे पाळत आलो आहे. दिल्ली मेट्रोच्या प्रमुख सल्लागार पदाचा राजीनामा देऊन मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच श्रीधरन यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती. पक्षात प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने भाजपमधील काही नेतेही खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत.  

दरम्यान, याआधी बोलताना श्रीधरन म्हणाले होते की, भाजपची इच्छा असल्यास मी केरळ विधानसभा निवडणूक लढेन. तसेच, पक्षाने विचारल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासही माझी तयारी आहे. केरळमध्ये भाजप सत्तेवर आल्यास पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. याचबरोबर राज्याला कर्जमुक्त करण्यावर भर दिला जाईल. 

केरळमध्ये 6 एप्रिलला विधानसभा निवडणूक होत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या ८८ वर्षांच्या श्रीधरन यांनी राज्यपालपदात कोणताही रस नसल्याचे सांगितले होते. राज्यपाल हे पद संपूर्णपणे घटनात्मक आहे. या पदावरून राज्याच्या विकासासाठी भरीव कार्य करता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. 

केरळमध्ये सध्या डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एलडीएफ) सरकार आहे. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यू़डीएफ) विरोधात आहे. मागील अनेक वर्षे राज्यात या दोन्ही आघाड्यांकडे सत्ता राहिली आहे. राज्यात भाजपचे स्थान अगदी नगण्य आहे. श्रीधरन यांनी पक्षात प्रवेश केल्याने फायदा होईल, असा भाजपचा कयास आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com