एका अपक्ष आमदाराने पाडली वादाची ठिणगी...मीना समाजाचे आमदार पायलट यांच्या पाठीशी

राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाराज आहेत. आता काँग्रेसचे मीना समाजाचे आमदार हे पायलट यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
एका अपक्ष आमदाराने पाडली वादाची ठिणगी...मीना समाजाचे आमदार पायलट यांच्या पाठीशी
meena community mlas support congress leader sachin pilot

नवी दिल्ली : राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) हे पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने  नाराज आहेत. यातच मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गटाच्या अपक्ष आमदाराने पायलट यांच्यावर टीका केल्याने वातावरण तापले आहे. काँग्रेसचे मीना समाजाचे आमदार हे पायलट यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यामुळे मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह काँग्रेस श्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. 

गेहलोत गटाचे अपक्ष आमदार रामकेश मीना यांनी पायलट यांच्यावर नुकतीच टीका केली होती. यानंतर मीना समाजाच्या सर्व काँग्रेस आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पायलट यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मीना समाजाचे नेते आमदार मुरारीलाल मीना म्हणाले की, सचिन पायलट हे एका जातीचे नसून, 36 जातींचे नेता आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष असताना अनेक जातींना जोडण्याचे काम केले. मागील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत पायलट यांच्या नेतृत्वाखाली एकजूट होत गुर्जर आणि मीना समाजाने काँग्रेसला मते दिली. पायलट परिवाराने मागील 42 वर्षांपासून राजस्थानसाठी घाम गाळला आहे. पायलट हे प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला राज्यात विजय मिळाला होता. त्यामुळे बाहेरील व्यक्तीने त्यांच्यावर टीका करु नये. 

काँग्रेस आमदार पी.आर.मीना म्हणाले की, एक अपक्ष अशा प्रकारचे विधान करतो हे समाजासाठी अतिशय दुर्दैवी आहे. सर्व समाजाच्या मतांवर निवडून गेलेला आमदार असे विधान करीत आहेत. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, त्यांना त्यांची आजीच आठवेल. समाजाने या अपक्ष आमदाराला कधीही आपला प्रवक्ता नेमलेले नव्हते. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मागील वर्षी पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पायलट यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

राजस्थानमधील सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला आहे. पायलट यांनी बंड केले त्यावेळी साथ देणाऱ्या अपक्ष व इतर आमदारांना डावलता येणार नाही, असे गेहलोत यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. हा आता वादाचा मुद्दा बनला आहे. मागील वर्षी पक्षाच्या विरोधात बंड करुन पायलट दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात आले होते. आता त्यांची मागणी मान्य केल्यास याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती पक्षाला वाटत आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in