
Maratha Reservation News : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अन्नत्याग केला. मारोती मंदिरासमोर टाकलेल्या मंडपातून जरांगे पाटील पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या समाज बांधव, तरुण कार्यकर्ते, महिला, मुलं, वृद्ध अशा सगळ्यांनाच आपली भूमिका पटवून देत होते. या दरम्यान त्यांनी केलेले भाषण काळजाला भिडणारे ठरले. समोर हजारोंचा जमाव त्यांना उद्देशून हातात माईक घेऊन जरांगे यांनी भाषण केले.
`मी घरातल्या लक्ष्मीला सांगून आलो आहे. राहयलो तर तुहा, नाही त समाजाचा. कुकू पूसायला तयार रहायं`, जरांगेंच्या या शब्दांनी त्यांच्या आंदोलनातील प्रामाणिकता, हेतू आणि समर्पणाची भावना उपस्थितांच्या काळजाला भिडली. कुठल्याही परिस्थितीत जरांगेंना एकटं पडू द्यायचं नाही, असं तिथे उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाने ठरवलं आणि आसपासच्या शंभरहून अधिक गावातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला.
सत्ताधाऱ्यांनाही भरली धडकी..
सकाळपासून गावागावातून लोक मिळेल त्या वाहनाने अंतरवालीत दाखल होत होते. जरांगे यांची भूमिका समजून घेत होते, त्यांच्या आंदोलनाला बळ देत होते. आठ जणांनी मिळून सुरू केलेल्या या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने लोक सहभागी होऊ लागले. आंदोलनाला मिळणारा पाठिंबा पाहून सत्ताधाऱ्यांनाही धडकी भरत होती. उपोषणाच्या तिसऱ्या दिवसापासून अंतरवालीतील आंदोलनाचे लोण आसपासच्या गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात पसरायला सुरूवात झाली.
गुरुवारी वडीगोद्री गावाने ग्रामसभेत बंदचा ठराव घेतला आणि गावात बंद पाळला. शेजारच्या शहागड, साष्टपिंपळगाव, तीर्थपुरी, अंतरवाली सराटी ग्रामस्थांनीही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दि. १ सप्टेंबर रोजी गाव बंदची हाक दिली होती. एकीकडे जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अंतरवालीत उपोषण तर दुसरीकडे विविध गावातील ग्रामस्थांकडून रॅली काढून उपोषणाला पाठिंबा देणे सुरू होते. दुसरीकडे शासनाला मागण्यांचे निवदेन देत प्रयत्न सुरू होते. आंदोलनाला पाठिंबा वाढत होता. जरांगे माघार घेण्यास तयार नव्हते, इकडे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे टेन्शन वाढले होते. याचा परिणाम काय होईल, याची पुसटशीही कल्पना कुणाला नव्हती. पण दि. १ सप्टेंबर उजाडला तो आंदोलकांसमोर एक मोठे संकट घेऊन. एवढे भयानक संकट ज्याची स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती.