'वंचित'चे अनेक कार्यकर्ते ताब्यात   - Many 'deprived' activists arrested | Politics Marathi News - Sarkarnama

'वंचित'चे अनेक कार्यकर्ते ताब्यात  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

परभणी शहरात काल रात्री पासूनच पोलिसांनी आपली दडपशाही दाखवण्यास सुरुवात केली. अनेक कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस देण्यात आली.

परभणी : राज्यातील एसटी तसेच शहरांतर्गत चालणाऱ्या बस सेवा सुरळीत करण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभर डफली वाजवत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, परभणीत आंदोलनाला सुरुवात होता असतानाच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही एक प्रकारे प्रशासनाची दडपशाही असून या घटनेचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात येत आहे.

परभणी शहरात काल रात्री पासूनच पोलिसांनी आपली दडपशाही दाखवण्यास सुरुवात केली. अनेक कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस देण्यात आली. ही नोटीस घेण्यास अनेक कार्यकर्ते तयार नसताना त्यांना पोलिस ठाण्यात बोलवून अगदी दमदाटी,जबरदस्ती करीत नोटीस घ्यायला भाग पाडले. त्यानंतर त्यांना आंदोलन केल्यास आम्ही कठोर कारवाई करू असे सांगितले. त्यानुसार आज सकाळी पोलिसांनी कारवाईला सुरुवात करीत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात उतरले आहेत. मात्र सामान्य नागरिकांचे प्रश्न आता मांडायचे की नाही, असा प्रश्न प्रशासनाच्या या दडपशाहीमुळे पडला आहे.

केंद्र व राज्य सरकार लॉकडाउन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार येत आहे.  

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

संबंधित लेख