भाजपचे बडे नेते लोक जनशक्ती पक्षात जाताहेत की यामागे दुसरी खेळी? - many bjp leaders are joining lok janshakti party for bihar assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे बडे नेते लोक जनशक्ती पक्षात जाताहेत की यामागे दुसरी खेळी?

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत लोक जनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विरोध करीत बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी देश पातळीवर भाजपला पाठिंबा कायम राहील, अशी भूमिका एलजेपीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी घेतली आहे. आता भाजपमधील अनेक नेते एलजेपीमध्ये प्रवेशासाठी रांग लावू लागले आहेत. यातील अनेकांचे मतदारसंघ जागावाटपात जेडीयूकडे गेले आहेत. यामुळे ही भाजपचीच खेळी असल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अनेक भाजप नेते एलजेपीमध्ये प्रवेशासाठी गर्दी करु लागले आहेत. यातील बहुतांश नेत्यांचे मतदारसंघ हे जागावाटपात एनडीएकडे गेले आहेत. भाजप नेते पक्षांतर करीत असताना भाजप नेतृत्व याकडे काहीच घडत नसल्याप्रमाणे पाहत आहे. तसेच, यावर काही प्रतिक्रियाही देताना दिसत नाही. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे भाजप म्हणत आहे. याचवेळी भाजपकडून जेडीयूच्या विरोधात राजकारण सुरू आहे. 

चिराग पासवान हे स्वतंत्रपणे लढणार असून, ते जेडीयूच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत. यामुळे ते प्रामुख्याने जेडीयूची मते खातील. मात्र, ते भाजपला पाठिंबा देणार आहेत. यामुळे भाजपला फायदाच होणार आहे. याचवेळी जेडीयूकडे जागावाटपात गेलेल्या मतदारसंघांतील नेते एलजेपीमध्ये जात आहेत. यामुळे या सगळ्या घटनाक्रमाकडे संशयाने पाहिले जात आहे. नितीश यांच्या जागा कमी करण्यासाठीच भाजपने चिराग पासवान यांना स्वबळाची चूल मांडण्यास सांगितले, अशीही चर्चा सुरू आहे. 

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राज्य उपाध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी एलजेपीत प्रवेश केला आहे.  मागील निवडणुकीवेळी भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणाऱ्या राजेंद्रसिंह यांनी चिराग पासवान यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राजेंद्रसिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी 36 वर्षांपासून काम करीत आहेत. ते निवडणूक लढणार असलेला दिनारा मतदारसंघ जेडीयूकडे गेला आहे. यामुळे त्यांच्या प्रवेशाने सर्वांनाच धक्का बसला आहे.  

आता एलजेपीकडे येणाऱ्या भाजप नेत्यांची यादी दिवसेंदिवस मोठी होत आहे. आज भाजपच्या माजी आमदार उषा विद्यार्ती यांनी एलजेपीत प्रवेश केला. त्यांचा पालीगंज हा मतदारसंघही जेडीयूकडे गेला आहे. भाजपचे आमदार रवींद्र यादव यांच्यासह रामनरेश चौरासिया, वरुण पासवान हे बडे नेतेही एलजेपीमध्ये डेरेदाखल झाले आहेत. या मुद्द्यावर भाजप नेतृत्वाने सूचक मौन धारण केले असले तरी जेडीयूमधील अस्वस्थता वाढली आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख