मोदींना आव्हान देणारे तेजबहादूर आहेत तरी कोण..? - man who challenged prime minister narendra modi from varanasi | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींना आव्हान देणारे तेजबहादूर आहेत तरी कोण..?

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारे तेजबहादूर यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघातून  आव्हान देणारे तेजबहादूर यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना मिळत असलेल्या निकृष्ठ अन्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. परंतु, हे सत्य मांडणे त्यांना महागात पडून त्यांची बीएसएफमधून हकालपट्टी झाली होती. 

बीएसएफमध्ये जवानांना मिळत असलेल्या निकृष्ठ अन्नाचा व्हिडीओ तेजबहादूर यांनी तयार केला होता. या व्हिडीओद्वारे त्यांनी हा प्रश्न सगळ्यांसमोर मांडला होता. त्यांनी 2017 मध्ये  ऑनलाइन पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली होती. याच कारणावरुन नंतर तेजबहादूर यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते. ते मूळचे हरियानातील रेवाडी येथील आहेत. 

तेजबहादूर यांना बडतर्फ करण्यासाठी दोन कारणे देण्यात आली होती. यातील पहिले कारण होते सोशल मीडियावरुन खोटे आरोप करणे आणि दुसरे कारण होते कर्तव्यावर असताना दोन मोबाईल बाळगणे. त्यावेळी तेजबहादूर यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. याचबरोबर साक्षीदार म्हणून सहकाऱ्यांना हजर करण्याची परवानगीही देण्यात आली नव्हती. 

मात्र, त्यावेळी तेजबहादूर यांना सामान्य नागरिक आणि सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यांनी याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांचा उमेदवारी अर्जच रद्द केल्याने ते मैदानातच उतरू शकले नव्हते. 

तेजबहादूर यांनी मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अर्ज भरला होता. परंतु, त्यांचा अर्जच निवडणूक आयोगाने रद्द केला होता. या विरोधात तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. 

तेजबहादूर यांनी सुरूवातीला अपक्ष म्हणून आणि नंतर समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तेजबहादूर यांचा अर्ज रद्द ठरवला होता. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला होता. 

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तेजबहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सरन्यायाधीश एस.ए.बोबडे, न्यायाधीश ए.एस.बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रह्मण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी 18 नोव्हेंबरला निकाल राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. तेजबहादूर यांची मागणी फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. 

बाह्य दबावामुळे आपला अर्ज रद्द करण्यात आला, असे तेजबहादूर यांनी म्हटले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा उमेदवारी अर्ज फेटाळून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी घोषित केले असून, त्यांची विजय अवैध ठरवावा, अशीही मागणी त्यांनी केली होती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख