नंदिग्रामचा निकाल मान्य पण न्यायालयात जाणार; ममता बॅनर्जींची भूमिका - mamata banerjee will chanllenge nandigram result in court | Politics Marathi News - Sarkarnama

नंदिग्रामचा निकाल मान्य पण न्यायालयात जाणार; ममता बॅनर्जींची भूमिका

वृत्तसंस्था
रविवार, 2 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बहुमतासह सत्ता स्थापन करणार आहे. परंतु, नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींना धक्का बसला आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजपचे स्वप्न भंगलेआहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 215 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. परंतु, नंदिग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला आहे. या निकालाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका ममतांनी घेतली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 215, भाजप 76 व इतर 1 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्तास्थापन करणार आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

ममता आणि सुवेंदू अधिकारी यांच्या नंदिग्राममधील सामना रंगतदार ठरला होता. ममतांनी त्यांचा पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडून त्यांनी नंदिग्राममधून निवडणूक लढवली होती. अतिशय अटीतटीच्या लढतीत अधिकारींनी त्यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. ममतांनी या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ममता म्हणाल्या की, निकाल मान्य आहे. पण मी न्यायालयात जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी गैरप्रकार करण्यात आले आहेत. त्याचा मी पर्दाफाश करेन. नंदिग्रामची काळजी करु नका. मी नंदिग्रामसाठी खूप मोठा लढा दिला आहे. हे ठीक आहे. नंदिग्राममधील जनतेचे जो काही कौल असेल तो आम्हाला मान्य आहे. मी तो मान्य करेन. याबद्दल मला काही वाटत नाही. आम्ही राज्यात 221 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असून, भाजप ही निवडणूक हरला आहे. 

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 

एक्झिट पोलपेक्षाही ममतांची कामगिरी सरस 
एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या लढतीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, तृणमूलला 149 जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. याचवेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला 116 जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 16 जागा मिळतील. 

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका घेण्यात आल्या. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख