निवडणूक निकालाच्या धामधुमीतही ममतादीदी म्हणाल्या, महाराजा तोमारे सलाम!

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बहुमतासह सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत.
mamata banerjee pays tribute to satyajit ray on his 100 birth anniversary
mamata banerjee pays tribute to satyajit ray on his 100 birth anniversary

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगण्याची चित्र सध्या तरी दिसत आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 206 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तसेच, नंदिग्राममध्ये पिछाडीवर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आता आघाडीवर गेल्या आहेत. यातच ममतांनी केलेल्या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये दुपारी 2.30 पर्यंत तृणमूल काँग्रेस 206, भाजप 83, डावे 1 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्तास्थापन करतील, असे चित्र दिसत आहे. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. 

आज ममता या विजयाच्या जवळ दिसत असल्या तरी त्यांनी पुन्हा एकदा बंगाली अस्मितेचे दर्शन घडवले आहे. त्यांनी आज देशभरात चर्चा सुरू असलेल्या निकालांबाबत कोणतेही ट्विट केले नाही. पण ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ट्विट केले आहे. ममतांनी यातून पुन्हा एकदा बंगाली अस्मिता दाखवून दिल्याची चर्चा सुरू आहे. 

ममतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराजा, तुम्हाला सलाम. महान दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गीतकार  सत्यजित राय यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन. ते केवळ बंगालचा नव्हे संपूर्ण भारत आणि जगाचा अभिमान आहेत. जगभरातील लोकांसाठी ते प्रेरणादायी आहेत.    

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 

एक्झिट पोलपेक्षाही मततांची कामगिरी सरस 
एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालच्या लढतीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, तृणमूलला 149 जागा मिळवून ममता बॅनर्जी सत्ता ताब्यात ठेवतील. याचवेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला 116 जागा मिळतील. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला 16 जागा मिळतील. 

निवडणूक आयोगाकडून चारे राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका घेण्यात आल्या. यात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत झाल्या आहेत. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसाममध्येच भाजपची सत्ता आहे. पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसची पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला  होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com