मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी...शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढणार - MahaVikas Aghadi allies to contest BMC polls together says Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी...शिवसेना, काँग्रेस अन् राष्ट्रवादी एकत्र लढणार

वृत्तसंस्था
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन सत्ता मिळवली. आता हाच प्रयोग मुंबई महापालिकेत होणार आहे. 
 

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी मुंबई महापालिकेतही एकत्र येणार आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी याचे सूतोवाच केले आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. यामुळे इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे तिन्ही पक्ष एकत्रपणे लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सध्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. देशातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक 33 हजार 400 कोटी रुपयांचे आहे. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई महापालिकेची 2022 ची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रितरीत्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीच सत्तेत कायम राहणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेची निवडणूकही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाईल. आम्ही मुंबई महापालिका नक्कीच पुन्हा जिंकू. 

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजधानीतील महापालिका लढणार असून जिंकणारही आहे. मुंबईत शिवसेनेशिवाय कोण जिंकू शकतो? महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता कायम राहणार आहे, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

मागील वर्षी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले होते. भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन झालेल्या वादातून शिवसेनेने युती तोडली होती. यामुळे अखेर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊन भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. राज्यातील मुंबईसह दहा महापालिका, 27 जिल्हा परिषदा आणि ग्राम पंचायतींच्या निवडणुका 2022 मध्ये होणार आहे. या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.   

पोलिसावरील हल्ल्यावरुन राऊत आक्रमक 

मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्या प्रकरणीही संजय राऊत यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. ते म्हणाले होते की, पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या आरोपींना तुरुंगात पाठवण्याआधी त्या ठिकाणी जे बघे होते त्यांनी थंड बसता कामा नये. आपल्यासाठी हुतात्मा होणाऱ्या पोलिसांवर कोणी तरी ऐरेगैरे हात टाकतात, कोणी तरी नटी उठते आणि त्यांना माफिया म्हणते आणि आपण सर्वजण सहन करतो. आज त्यांच्यावर जरी कारवाई झाली असली तरी समाजाने अशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख