मोठी बातमी : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ - maharastra government postpones date of cooperative organisations election | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 51 हजार 153 झाली आहे. यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. याबाबतचा आदेश सहकार व पणन विभागाने काढला आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी 18 मार्च आणि 17 जूनच्या आदेशान्वये पुढे ढकलल्या होत्या. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे या निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी त्यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या सहकारी संस्थांव्यतिरिक्त इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत घेता येणार नाहीत. 

राज्यात दीड लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. मागील वर्षी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 13 हजारांवर होती. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे 32 हजार सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. राज्यात सहकारी संस्थांबाबत 97 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर निवडणुका लांबणीवर  पडल्या होत्या. त्यानंतर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन महिने निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्याची मुदत 18 जूनपर्यंत होती. त्यानंतर निवडणुकांना पुन्हा 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 

राज्यात कोरोनाचा कहर कायम 

राज्यात कोरोनाचा कहर कायम आहे. राज्यात आज 11 हजार 921 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 51 हजार 153 झाली आहे. दिवसभरात 19 हजार 932 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 77.71 आहे. राज्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.  दिवसभरात 19 हजार 932 रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 10 लाख 49 हजार 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 

आज राज्यात दिवसभरात 180 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 35 हजार 751 वर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांपासून मृतांची संख्या 400 पेक्षा अधिक झाली होती ती 180 पर्यंत खाली आली. आज नोंद झालेल्या 180 मृत्यूंपैकी 98 मृत्यू हे मागील 48 तासांतील, तर 45 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 37 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख