एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या - maharashtra state government postpones all mpsc exams due to covid19 pandemic | Politics Marathi News - Sarkarnama

एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

वृत्तसंस्था
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

राज्यातील कोरोना संकटामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षांबाबत सुधारित वेळापत्रकही जाहीर केले होते. मात्र, कोरोना संकटामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

एमपीएससीने आधी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. सुधारित वेळापत्रकात राज्य सेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब - संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार होती. तर 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा होणार होती. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाची माहिती देण्याती आली.  

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची स्थापना होणार आहे. याचबरोबर राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. यात संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य सरकारने यंदा नोकरभरती होणार नाही, असे जाहीर केले होते. या परीक्षांसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. एमपीएससीने सुधारित वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. कोरोना संसर्गामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून परीक्षा घेण्याचे आवाहान एमपीएससीपुढे आहे.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख